राहुल गांधीबाबत विरोधकांना धास्ती – आ. सतेज पाटील

कोल्हापूर : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशभरात ‘संविधान बचाव’चे वातावरण तयार केले आहे. त्याची धास्ती भाजप आणि मित्र पक्षांनी लोकसभेच्या वेळी घेतली, तशीच धास्ती विधानसभेलाही घेतली आहे. त्यामुळे काही वाचाळवीर खालच्या स्तरावर जाऊन राहुल गांधी यांच्या विरोधात वक्तव्ये करत आहेत. त्यांचा कॉंग्रेस पक्षाच्यावतीने आपण जाहीर निषेध करत असून येत्या निवडणुकीत जनताच महायुतीला याचे उत्तर देईल. असा विश्वास विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी अजिंक्यतारा कार्यालय येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

 

 

वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असलेले शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांचा आमदार सतेज पाटील यांनी समाचार घेतला. भाजपच्या पायाखालची वाळू सरकत चालली आहे. वाचाळवीरांच्या वक्तव्याला त्यांच्याच भाषेत आम्ही उत्तर देऊ शकतो, पण ती कॉंग्रेसची संस्कृती नाही. भाजपच्या ५ खासदारांनीच त्यांचे सरकार घटना बदलणार असल्याचे म्हटले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली ही घटना अबाधित राहिली पाहिजे ही भूमिका राहुल गांधीनी मांडली. याची सत्यता लोकानाही माहित आहे, असे पाटील यांनी सांगितले.

महायुतीत प्रचंड वाद
विधानसभा निवडणूक जागावाटपाबाबत बोलताना सतेज पाटील म्हणाले, महायुतीमध्ये जागावाटपावरून बरेच वाद आहेत. त्यांच्या रिक्षाचे नटबोल्ट, चाके निखळू लागली आहेत. प्रत्येक जिल्ह्यात त्यांच्यात भांडणे आहेत. दुसरीकडे आमच्या महाविकास आघाडीत उत्तम समन्वय आहे. आमच्यात कोणतेही वाद नाहीत. बऱ्याच जागांवर एकमत झाले आहे. शंभरएक जागांवर चर्चा सुरु आहे. लोकसभेवेळी ४८ जागा आम्ही एकमताने लढवल्या होत्या, त्याच पद्धतीने एकमताने यावेळीही निवडणूक लढवू.

तिसरी आघाडी कठीणच
तिसऱ्या आघाडीच्या चर्चावरही त्यांनी भाष्य केले. जनतेसमोर महायुती आणि महाविकास आघाडी असे दोन पार्याय आहे. जनतेला राज्यात स्थिर सरकार हवे आहे. लहान पक्षांचा टेकू, ब्लकमेलिंग नको आहे, त्यामुळे जनता तिसरी आघाडी स्वीकारणे कठीण आहे. राज्यातील मतदार महाविकास आघाडीच्या बाजूनेच कौल देईल असा विश्वास  पाटील यांनी व्यक्त केला.

‘वंदे भारत’साठी सोयीची वेळ, कनेक्टीव्हीटी गरजेची
‘वंदे भारत’ ट्रेनची वेळ प्रवाशांच्या सोयीची असावी, तसेच त्यांची योग्य कनेक्टीव्हीटी असावी. तिकीट दर एक हजारांच्या खाली असावेत, पोहचण्यासाठी लागणार वेळ कमी करता आल्यास त्याला चांगला प्रतिसाद मिळेल. त्याचबरोबर नवी ट्रेन सुरु करताना जुन्या बंद करणे चुकीचे असल्याचे मत  पाटील यांनी मांडले.