‘मुख्यमंत्री योजनादूत’ होवूया; दरमहा 10 हजार मानधन मिळवूया ! * कोल्हापूर जिल्ह्यात २४०० योजनादूतांची होणार निवड; जिल्ह्यात आतापर्यंत १५५ जणांनी केली नोंदणी * १३ सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याची मुदत

कोल्हापूर : शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची ६ महिन्यांसाठी निवड केली जाणार असून या योजनादूतांना दरमहा १० हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात एकूण २४०० योजनादूतांची ६ महिन्यांसाठी निवड केली जाणार असून आज रविवारी सकाळ पर्यंत १५५ उमेदवारांची नोंदणी झाली आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी १३ सप्टेंबरपर्यंत www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करावयाची आहे.

 

 

 

राज्य शासनाचे माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय हे शासन आणि जनता यांच्यामधील दुवा समजले जाते. शासकीय योजना, उपक्रम, शासन निर्णय व शासकीय कार्यक्रमांची प्रसिद्धी जिल्हा माहिती कार्यालयांच्या माध्यमातून महासंचालनालय प्रभावीपणे करत असते. शासकीय योजनांचा लाभ राज्यातील अधिकाधिक नागरिकांना होण्याच्या उद्देशाने शासकीय योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने राज्यभरात मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे.