मुंबई: केंद्रीय मंत्री अमित शहा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच गणेश उत्सव सुरू असल्याने मुंबईमध्ये लालबागच्या दर्शनासाठी पोहोचले आहेत. अमित शहा यांच्या या दौऱ्यामध्ये जागा वाटपावरून निर्णय होण्याची शक्यता आहे.
अमित शहा यांच्याकडे भाजपने विधानसभेसाठी 160 जागा हव्यात असा आग्रह धरला आहे. विधानसभेच्या जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी महायुतीचा कल आहे. रविवारी रात्री भाजपच्या नेत्यांनी अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार पंकजा मुंडे उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीमध्ये शिंदे गटाला यश मिळालं असलं तर यामध्ये भाजप कार्यकर्त्यांचा वाटा असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे त्यांच्याकडून जागांचा आग्रह झाला तरी ताकद पाहूनच निर्णय घ्यावा अशी भूमिका भाजपच्या राज्यातील नेत्यांनी घेतल्याची समजते.