मुंबई : मालवण येथे राजकोट किल्ल्यावर उभा करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काही दिवसापूर्वी कोसळला. त्यामुळे नागरिक संतप्त झाले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीरपणे माफी मागितली आहे.
प्रसार माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांची मी जाहीरपणे माफी मागतो. या घटनेबाबत काल रात्री एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीमध्ये सरकार मधील मंत्री तसेच नौदलाचे अधिकारी आणि पोलीस सुद्धा उपस्थित होते. या बैठकीमध्ये एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमध्ये नौदलाचे अधिकारी, तज्ञ शिल्पकार आणि इतर विषयातील तज्ञ यांचा समावेश करण्यात आला आहे
ज्या ठिकाणी पुतळा उभा होता तिथे वारे, वातावरण आणि एकूणच परिस्थितीचा आढावा घेऊन महाराजांचा नवीन मजबूत पुतळा उभा करण्यात येणार आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या महाराजांच्या पायावर मी शंभर वेळा माफी मागायला मला काही वाटणार नाही.असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.