कोल्हापूर प्रतिनिधी :संग्राम पाटील
महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचा विचार राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी अंगीकारला आणि तो पुढे नेला, यातूनच देश निर्माण झाला असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.टी.एस.पाटील यांनी केले. श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात आज श्रीपतराव बोंद्रे दादा व्याख्यान माले अंतर्गत सत्यशोधक चळवळ आणि शाहू महाराज या विषयावरील पहिले पुष्पगुंफताना ते बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
प्रारंभी संस्थेच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्राचार्य शानेदिवाण लिखित चार पुस्तके भेट देऊन प्राचार्य डॉ. टी. एस पाटील यांचे स्वागत करण्यात आले.
प्राचार्य टी. एस. पाटील म्हणाले, सत्यशोधक चळवळीची आणि सुधारणांची मोटी परंपरा महाराष्ट्राला आहे. भारतीय संविधानात याचे प्रतिबिंब पडलेले आहे. पूर्वीपासूनच अभिजन वर्गाने कष्टकरी बहुजन समाजाचा गैरफायदा घेतलेला आहे. त्यांच्याविरोधात लढणारा बळीराजा हा पहिला राजा होता.जे सत्य आहे, खरे आहे त्यास तो मानणारा होता.अभिजन लोक खोट्याला खरे मानण्यात गुंतलेले होते. सत्य शोधनाची ही परंपरा पुढे वर्धमान महावीर, गौतम बुद्ध, सम्राट अशोकाने पुढे नेली.
महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचा विचार राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी अंगीकारला. शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात विविध प्रयोग केले. अनेक उपक्रम राबवले. शेती, उद्योग, व्यापारात आधुनिक तंत्र आणले. तसेच अभिजन वर्गाच्या विरोधात जाऊन 50 टक्के आरक्षणाचे तत्व लागू केले.आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन दिले.बहुजन समाजातील मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य दिले, त्यांच्यासाठी शिक्षणाची आणि वस्तीगृहाची दारे खुली केली.
राजर्षी शाहू महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार जगभर पोचण्यासाठी प्रयत्न केले. शिवाजी महाराजांच्या मराठीतील, इंग्रजीतील पुस्तकांसाठी हजारो रुपयांची देणगी त्यांनी लेखकांना दिली. या पुस्तकांच्या प्रती जगभरातील विद्यापीठांना आणि महाविद्यालयाना त्यांनी पाठवल्या.
पुढे तोच विचार कर्मवीर भाऊराव पाटील, बापूजी साळुंखे, प्राचार्य एन.डी.पाटील यांनी पुढे नेला.
ते म्हणाले,माजी मंत्री स्वर्गीय श्रीपतराव बोंद्रे दादा यांनी तर महात्मा फुले यांच्या नावाने फुलेवाडी वसवली.येथे देशातील पहिली महात्मा फुले गृहनिर्माण संस्थेची स्थापना त्यांनी केली. महात्मा फुले, शाहू महाराज, यशवंतराव चव्हाण यांचे विचार त्यांनी जोपासले.
प्राचार्य डॉ.आर.के.शानेदिवाण म्हणाले, श्रीपतराव बोंद्रे दादा यांनी महात्मा फुलेंचे तत्त्वज्ञान अंगीकारले आहे आणि त्यानुसार ते जगले आहेत.शाहू महाराजांनी सत्यशोधक विचाराची दृष्टी समाजाला दिली आहे. त्यानुसार सर्वांनी वाटचाल करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
स्वागत व प्रास्ताविक डॉ. एस. एस. राठोड यांनी केले. सूत्रसंचालन व पाहुण्यांची ओळख डॉ. व्ही.जे.देठे यांनी करून दिली. आभार डॉ. सुरेखा मंडी यांनी मानले.
आय क्यू ए सी समन्वयक डॉ.आर.डी.मांडणीकर, सहसमन्वयक डॉ. ए. बी. बलुगडे,सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, विद्यार्थी या व्याख्यानमालेस उपस्थित होते .
श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे यांचे या उपक्रमास प्रोत्साहन मिळाले.