कोल्हापूर : नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचे आज पहाटे चार वाजता निधन झालं. गेल्या काही दिवसापासून ते आजारी होते. त्यांना श्वास घेण्यात अडचण होत होती. तसेच त्यांना लो बीपीचाही त्रास होत होता. कुटुंबियांनी त्यांना नांदेड येथील रुग्णालयात दाखल केलं, तिथे उपचार घेतल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना हैदराबाद येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं, त्यांच्यावर हैदराबाद येथील किम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते मात्र अखेर पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
वसंत चव्हाण खासदार होण्या आधी महाराष्ट्र विधानसभेवर अपक्ष म्हणून निवडून गेले होते. त्यांनी नायगाव विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्यांनी 2014 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. याशिवाय मे 2014 मध्ये त्यांची विधानसभेच्या लोकलेखा समितीवर नियुक्ती करण्यात आली होती. ते जनता हायस्कूल आणि अॅग्रीचे अध्यक्षही होते.
अशोक चव्हांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपनं त्यांना राज्यसभेवर घेतलं आणि त्यानंतर भाजपला नांदेड आणि हिंगोली लोकसभा जिंकण्याचा मार्ग मोकळा झाला. भाजपकडून प्रताप पाटील चिखलीकरांना पुन्हा संधी देण्यात आली तर काँग्रेसकडून वसंतराव चव्हाणांना संधी देण्यात आली. अशोक चव्हाणांचा पाठिंब्यामुळे भाजप नांदेडची जागा सहज जिंकेल अशी चर्चा असताना मतदारांनी मात्र वेगळाच निर्णय घेतल्याचं दिसून आलं. काँग्रेसच्या वसंतराव चव्हाणांनी भाजपच्या प्रताप चिखलीकरांचा मोठा पराभव केला आणि अशोक चव्हाणांच्या जाण्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस संपली नसल्याचा संदेश दिला.