कोल्हापूर:कोल्हापूरची प्रसिद्ध एव्हरेस्टवीर कस्तुरी सावेकरचा माणचे सरपंच संजय नाना पाटील यांनी ऐतिहासिक युद्ध भूमी पांढरे पाणी येथे गौरव केला. कस्तुरी सावेकर, तिचे वडील तसेच कोल्हापूर परिसरातील गिर्यारोहकांची टीम पन्हाळा ते पावनखिंड ट्रेकिंग करीत चालले होते.
ही माहिती मिळताच शाहूवाडी तालुक्यातील माण येथील सरपंच संजय पाटील त्यांचे सहकारी आनंदा धोंडीबा चौगुले व पाटील यांनी पांढरे पाणी येथे जाऊन कस्तुरी सावेकर व सहकारी यांची भेट घेतली. ऐतिहासिक पावनखिंडचे युद्ध पांढरे पाणी येथून सुरू झाले होते. माण आणि पांढरे पाणी गावांची हद्द एकच आहे.
एव्हरेस्ट शिखर सर करून कोल्हापूरची मान उंचावणाऱ्या कस्तुरीचा आपल्याला अभिमान आहे, असे सरपंच संजय पाटील यांनी यावेळी सांगितले. तसेच शिवरायांच्या युद्ध भूमीत कस्तुरी चे स्वागत करताना बाजी प्रभू देशपांडे यांनी लढवलेल्या पावनखिंड परिसरात तिचे विशेष स्वागत असल्याचे म्हटले. यावेळी उपस्थितांनी जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला.