कोल्हापूर/प्रतिनिधी
१९८२ ची जुनी पेन्शन योजना लागू होण्यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना कोल्हापूरच्या वतीने शनिवार १७ ऑगस्ट ला टाऊन हॉल बाग ते जिल्हाधिकारी कार्यालय ‘पेन्शन क्रांती महामोर्चा’ आयोजित केला असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे यांनी पत्रकार बैठकीत दिली.
ते म्हणाले, संघटनेच्या वतीने दहा वर्ष जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी लाखो कर्मचारी रस्त्यावर उतरलेले आहेत. नागपूर, मुंबई, दिल्ली, पुणे या ठिकाणी संघटनेच्या वतीने भव्य स्वरूपात आंदोलने झाली असून सरकार जुन्या पेन्शन च्या अंमलबजावणी साठी सकारात्मक नाही. अशी भावना शासकीय कर्मचाऱ्यात निर्माण झाली आहे. येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जो पक्ष “जुनी पेन्शन योजना” लागू करण्याची भूमिका घेईल त्याच पक्षाला मतदान करण्याबाबत व्होट फॉर ओपीएस- जुनी पेन्शन योजना मोहीम संपूर्ण महाराष्ट्रभर प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.
यापूर्वी जुन्या पेन्शनच्या लढ्यासाठी राज्यात मुंडन मोर्चा, आक्रोश मोर्चा, पेन्शन पायी दिंडी, काम बंद आंदोलन, बेमुदत संप अशा प्रकारची लक्षवेधी आंदोलने करून शासनाचे लक्ष वेधण्याचा महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना व राज्य शासनाच्या सर्व कर्मचारी संघटनांनी लक्ष वेधले आहे. तरीसुद्धा शासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी शासनाने “जुनी पेन्शन योजना, विनाअट लागू करावी या मागणीसाठी हे आंदोलन राज्यभर विविध जिल्ह्यात होत असल्याचे सांगण्यात आले.
या आंदोलनामध्ये महाराष्ट्र जुनी पेन्शन संघटना, सर्व प्राथमिक- माध्यमिक शिक्षण संघटना, मनपा सर्व केडरचे सर्व संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, ग्रामसेवक युनियन, आरोग्य विभाग अशा सर्व केडरच्या संघटना सहभागी होत असून या आंदोलनात राज्य शासन व सर्व कर्मचाऱ्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी संघटनेचे विजय रामाणे, मारुती फाळके, अमर वरुटे, संतोष गायकवाड, बालाजी पांढरे, श्रीनाथ पाटील,निलेश कारंडे, राहुल कांबळे, विश्वनाथ बोराटे, प्रमोद पाटील, प्रकाश भोसले, आरती पवार उपस्थित होते.