बांगलादेशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. तेथील पंतप्रधान शेख हसीना यांनी पदाचा राजीनामा दिला असून त्या भारतात आश्रयासाठी आल्या आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशीमधील परिस्थिती बिघडल्यानंतर या घडामोडी घडल्या. त्यामुळे आता बांगलादेशात वास्तव्यात असलेले जवळपास १ कोटी हिंदू निर्वासित भारतात येतील, अशी भीती भाजपा नेते आणि पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी व्यक्त केली आहे. फ्री प्रेस जर्नलने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना अधिकारी म्हणाले की, पश्चिम बंगालच्या लोकांनी बांगलादेशातील एक कोटी हिंदू निर्वासितांच्या प्रवेशासाठी तयार राहावे. बांगलादेशात हिंदूंची कत्तल केली जात आहे. रंगपूर नगर परिषदेचे नगरसेवक हरधन नायक यांची हत्या करण्यात आली आहे. सिराजगंज येथे तेरा पोलिसांची हत्या करण्यात आली होती, त्यापैकी नऊ हिंदू होते. नोआखली येथील हिंदूंची निवासस्थाने जाळण्यात आली आहेत. मी राज्यपाल सीव्ही आनंदा बोस आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना केंद्र सरकारशी बोलण्याची विनंती करू इच्छितो. कारण नागरिकत्व दुरुस्ती कायद्यात हे स्पष्टपणे नमूद केले आहे. बांगलादेशात जर कोणी धार्मिक हिंसाचाराचा बळी ठरला तर आपण त्यांना आवश्यक आश्रय दिला पाहिजे”, असं सुवेंदू अधिकारी म्हणाले.