म.रा. प्रा. शिक्षक समितीचे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक निदर्शने

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर एकाच दिवशी शासनाच्या जुलमी शासन निर्णयाच्या विरोधात 15 जून 2024 रोजी दुपारी दोन ते चार या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तमाम शिक्षक समितीच्या शिलेदार यांना या दिवशी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

संच मान्यतेचा शासन निर्णय हा सर्वांसाठी घातक असून ग्रामीण शिक्षणावर घाला घालणारा आहे हे सर्वांनाच ज्ञात आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्राच्या विविध भागांची भौगोलिक स्थिती वेगळी असताना शिक्षकांना एकच ड्रेस कोड शक्य आहे का? त्याच प्रमाणे विद्यार्थी गणवेशाचा सुद्धा घोळ आहे. नवभारत साक्षरतेचा प्रश्न याही वर्षी सुद्धां आवासून आहे. ऑनलाईन कामाने शिक्षक, मुख्याध्यापक त्रस्त आहेत. तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुमार कन्या शाळा एकत्रीकरणाचा नवाच घाट कोल्हापूर जिल्ह्याने घातला आहे. त्याचबरोबर पानशे प्रमाणे महाराष्ट्रभर समूह शाळा निर्माण करण्याचा आणि गोरगरिबांचे शिक्षण संपवण्याचा कुटिल डाव शासनाने केला आहे.

खऱ्या अर्थाने कोल्हापूर जिल्हा हा डोंगराळ जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि असे असताना सुद्धा गोरगरिबांचे शिक्षण होऊ न देता त्या लेकरांना फक्त खळ लावायलाच निर्माण करायचं असं शासनकर्त्यांच्या मनात आहे काय? अशी शंका निर्माण होत आहे. नित्य नवनवीन इतरही ज्वलंत समस्या आवासून उभ्या आहेत. यामुळे म.रा. प्रा. शिक्षक समितीने शासनास जाब विचारण्या करीता शाळेच्या पाहिल्याच दिवशी म्हणजे 15 जून 2024 ला एक दिवसीय आंदोलन करण्याचे ठरविले आहे.