शिवराज्याभिषेक दिनाला घराघरांवर भगवे झेंडे : शिवसेनेचे आवाहन

दरवर्षी ६ जून हा दिवस शिवराज्याभिषेक दिन म्हणून साजरा केला जातो . यावर्षी शिवराज्याभिषेक दिनाला ३५० वर्षे पूर्ण होतात. तर शिवराज्याभिषेक दिन महाराष्ट्र शासनाने व कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने मोठ्या उत्साहात साजरा करावा अशा मागणीचे निवेदन शिवसेनेच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधीकारी अमोल येडगे यांना देण्यात आले.

.छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचे दैवत आहेत. यावर्षी शिवराज्याभिषेक दिनाला ३५० वर्षे पूर्ण होतात याचे औचित्य साधून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शासकीय इमारतींवर व सर्व ग्रामपंचायतींवर स्वराज्याचे प्रतीक असणारा भगव्या झेंड्याचे झेंडावंदन करावे, गुढी उभी करावी व कोल्हापुरातील सर्व नागरिकांनीही घरावर भगवे झेंडे लावून गुढी उभी करावी. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये अभिवादन कारण्याच्या सुचना देण्यात याव्यात. कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळगड, पावनगड, विशाळगड, भुदरगड, रांजणागड, सामानगड, पारगड, कलानिधीगड, महिपालगड, गंधर्वगड हे शिवकालीन काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेले गड आहेत. हे गड ज्या प्रांताधिकारांच्या क्षेत्रात येतील त्यांनी व तेथील तहसीलदारांनी नागरिकांच्या सहभागाने त्या गडांवर ६ जून रोजी सकाळी ७: ३० वाजता भगवा ध्वज फडकवून गडाचे पूजन करावे व गुढी उभी करावी अशा मागण्या शिवसेनेच्या वतीने करण्यात आल्या आहेत.