‘या’ औषधी वनस्पती देतील शरीराला थंडावा

उन्हाळ्यात तापमान सरासरीपेक्षा जास्त वाढल्याने शरीराला थंडावा देणाऱ्या औषधी वनस्पतींचा समावेश आपल्या रोजच्या आहारात केल्यास पौष्टिकतेला चालना मिळते आणि ताजेतवाने वाटते. पुदिना, कोथिंबीर व तुळस यांसारख्या औषधी वनस्पती केवळ पदार्थांची चवच वाढवत नाहीत तर आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण फायदेही देतात आणि ते सॅलड, सूप आणि ज्यूसमध्ये जोडले जाऊ शकतात.

ताज्या चवीसाठी आणि सुगंधासाठी ओळखल्या जाणाऱ्या पुदिन्यामध्ये अनेक आवश्यक पोषक घटक आहेत. त्यात जीवनसत्त्वे अ व क, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम व पोटॅशियम असतात. पुदिन्यामधील मेन्थॉल गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्टच्या स्नायूंना आराम करण्यास मदत करते.  अपचन, सूज येणे आणि गॅसची लक्षणे कमी करते. याव्यतिरिक्त मेन्थॉल या घटकामध्ये डिकन्जेस्टंट गुणधर्म आहेत जे नाकातील सर्दी आणि अॅलर्जीची लक्षणे दूर करू शकतात. पुदिन्याच्या पानांमध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात. जे ऑक्सिडेटिव्ह तणावाचा सामना करतात आणि हृदयरोग व कर्करोग यांसारख्या दीर्घकाळ टिकणाऱ्या आजारांचा धोका कमी करू शकतात. त्याशिवाय पुदिन्याची पाने चघळण्यामुळे श्वास ताजातवाना होण्यास आणि तोंडातील जीवाणू कमी करण्यास मदत मिळू शकते.