राष्ट्रवादी काँग्रेसचा 25 वा वर्धापन दिन, कोण साजरा करणार धडाक्यात?

यावर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला  25 वर्ष पूर्ण होत आहेत. परंतु यावर्षीचे वर्ष हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी वेगळे असणार आहे. कारण या पक्षात आता दोन गट निर्माण झाले आहेत. हा पहिलाच वर्धापनदिन आहे आणि त्यात दोन्ही पक्षात फूट पडली आहे. त्यातही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी पक्षाचा 10 जून रोजी होणारा वर्धापनदिन सोहळा जोरदार साजरा करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत. लवकरच हा सोहळा दिल्लीत, मुंबईतील षण्मुखानंद हॉल येथे साजरा केला जाणार याबाबत देखील घोषणा होणार आहे. 

यावर्षीचे वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी महत्वाचे आहे कारण यंदा पक्षाचा 25 वा वर्धापनदिन सोहळा आहे. परंतु पक्षात आता दोन गट निर्माण झाले आहेत. अजित पवारांना काही कालावधी पुरते राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह मिळालं आहे. तर शरद पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या नावासह तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळालं आहे. त्यामुळे दोन्ही गटांसमोर कायदेशीर पेचप्रसंग निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने म्हणजेच अजित पवार यांच्यावतीने वर्धापन दिन साजरा आपण जोरदार साजरा करणार असल्याचं म्हंटलं आहे. सध्या पक्ष आणि चिन्हाचं प्रकरण जरी न्यायप्रविष्ठ असलं तरी कोर्टाने कोठेही वर्धापन दिन साजरा करण्यासाठी बंदी घातली नसल्याचं अजित पवार गटाचं म्हणणं आहे.

एकीकडे अजित पवार गटाने जोरदार तयारी केली असली तरी दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट देखील वर्धापन दिन साजरा करणार असल्याची सूत्रांनी माहिती आहे. पक्षाची स्थापना शरद पवार यांनी केली आहे. शिवाय सध्या पक्ष आणि चिन्ह दोन्ही न्यायप्रविष्ठ आहे त्यामुळे आम्ही देखील वर्धापन दिन 10 जूनला साजरा करु असा दावा शरद पवार गटाच्या वतीने करण्यात आला आहे.

सध्या जरी दोन्ही गटाने वर्धापन दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला असला तरी याप्रकरणी दोन्ही गट एकमेकांच्या विरोधात कायदेशीर कारवाईची शक्यता अजिबात नाकारता येत नाही.