दीड वर्षाच्या मुलाची साडेचार लाख रुपयांना विक्री केल्याच्या आरोपाप्रकरणी दोन तृतीयपंथीयांसह सहा जणांना पोलिसांनी अटक केली. आरोपीमध्ये मुलाच्या आई-वडिलांचाही समावेश आहे. याप्रकरणी डीएन नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी आरोपींविरोधात भादंवि कलम ३७०, ३४ सह अल्पवयीन न्याय कायदा कलम ८० व ८१ अंतर्गत सहाजणांविरोधात डीएन नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सीमा खान (३२) या प्रकरणातील तक्रारदार आहेत. तक्रारीनुसार, हुसैन शेख या एक वर्ष सात महिन्यांच्या मुलाची विक्री करण्यात आली. मुलाची आई नाजमीन शेख व वडील मोहम्मद शेख मालाड मालवणी परिसारीतल अब्दुल हमीद रोड परिसरातील वास्तव्यास आहेत. या दाम्पत्याने स्वतः आपल्या बाळाची विक्री केली. त्यासाठी अंधेरी पश्चिम इंदिरा नगर येथील तृतीयपंथी सायबा अन्सारी, त्याच परिसरात राहणारी राबिया अन्सारी व सकीना बानू शेख यांच्या मध्यस्थीने या बाळाची विक्री करण्यात आली.
सकीना शेख ही या दाम्पत्याची परिचित आहे. सायबा अन्सारीच्या परिचयातून ठाण्यातील इंद्रदीप ऊर्फ इंदर व्हटवार (४३) याला बाळाची विक्री करण्यात आली. व्हटवार हा चांगल्या कुटुंबातील असून समलिंगी आहे. त्याला मुलगा दत्तक घ्यायचा होता. वैद्यकीय खर्चासह चार लाख ६५ हजार रुपयांना बाळाची विक्री करण्यात आली. आरोपींच्या तावडीतून बाळाची सुटका करण्यात आली असून त्याला सध्या अंधेरी पश्चिम येथील सेंट कॅफरीन सुरक्षागृहात ठेवण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.