काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पी.एन. पाटील साहेब यांचे निधन झाल्याने येणाऱ्या ३१ मे रोजी होणारा माझा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय मी घेतला आहे. त्यामुळे या दिवशी मी शुभेच्छाही स्वीकारणार नाही. तसेच कार्यकर्ते आणि हितचिंतक यांनी फ्लेक्स बोर्ड, होर्डिंग्ज लावू नयेत. वाढदिवसानिमित्त आयोजित केलेले सर्व कार्यक्रम पुढे ढकलावेत, असे पत्रक आ. ऋतुराज संजय पाटील यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे की, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.एन.पाटील यांच्या निधनामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते शोकमग्न आहेत. पी.एन.पाटील यांनी अडचणीच्या काळात काँगेस पक्ष वाढीसाठी आपले योगदान दिले आहे. ते काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी आधारवड होते. त्यांच्या अकाली निधनामुळे काँग्रेस कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. अजूनही अनेक कार्यकर्ते या धक्क्यातून सावरले नाहीत. आपल्या कुटुंबातील कर्ता माणूस हरवल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यांनी माझ्यासारख्या युवक लोकप्रतिनिधींना नेहमीच मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. वडिलकीच्या आधार आपल्यातून निघून गेल्याची ही घटना अजूनही आम्हाला पटत नाही.
या पार्श्वभूमीवर मी माझा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. माझे कार्यकर्ते माझ्या या भावना समजून घेतील असा मला विश्वास आहे, असे ही आ. ऋतुराज पाटील यांनी म्हटले आहे.