राज्यात दहावीचा यंदाचा निकाल 95.81 टक्के ; मुलींनीच मारली बाजी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. दहावीचा यंदाचा एकूण निकाल 95.81 टक्के इतका लागला आहे.

यंदाच्या निकालामध्ये कोकण विभागानं बाजी मारली असून नागपूर विभाग मात्र विभागात सर्वात कमी निकाल लागला आहे. नागपूर विभाग 94.73 टक्क्यांसह राज्यातील विभागनिहाय टक्केवारीनुसार सर्वात खाली आहे. पुणे विभागात 96.44 टक्के निकाल लागला असून छत्रपती संभाजी नगर विभागात 95.19 टक्के , मुंबईमध्ये 95.83 टक्के , कोल्हापूर विभागात 97.45 टक्के ,  अमरावती मध्ये 95.58 टक्के , नाशिक मध्ये 95.28 टक्के , लातूर विभागात 95.27 टक्के तर कोकण विभागात सर्वात जास्त म्हणजेच 99.01 टक्के निकाल लागला आहे.

तर निकालांमध्ये पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 97.21 टक्के तर मुलांचा निकाल 94.56 टक्के लागला आहे. आकडेवारीनुसार, सर्वच विभागांमध्ये  मुलींनी बाजी मारली आहे. एकूण 72 विषयांपैकी 18 विषयांचा 100 टक्के लागला आहे. दरम्यान, दहावीच्या परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांच्या निकालाची एकूण टक्केवारी 94.86 टक्के इतकी आहे.