कोल्हापूर : ज्येष्ठ विचारवंत आणि ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांना ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी भाई माधवराव बागल पुरस्कार देण्यात येणार आहे. हा पुरस्कार २८ मे रोजी शाहू स्मारक भवन येथे देण्यात येणार आहे अशी माहिती भाई माधवराव बागल विद्यापीठाचे अध्यक्ष अशोकराव साळुंखे, कार्याध्यक्ष डॉ. टी. एस. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भाई माधवराव बागल हे राज्यातील क्रांतिकारक समाजसधारक, थोर परिवर्तनवादी नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या जयंतीदिनी माधवराव बागल विद्यापीठाकडून सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यास ५ हजार रुपये, शाल, फेटा, गौरवपत्र, स्मृतीचिन्ह या स्वरूपातील पुरस्कार प्रदान करण्यात येतो. हा कार्यक्रम मंगळवारी सायंकाळी शाहू स्मारक भवन येथे श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते व इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली प्रदान करण्यात येणार आहे.