दिवसभरातुन नेमकं कोणत्या वेळी पाणी पिलं पाहिजे

प्रत्येक ऋतूमध्ये शरीराला हायड्रेटेड ठेवणं अत्यंत गरजेचं असते. साधारणपणे आपापल्या अनुभवातून प्रत्येक ऋतूमध्ये शरीर सुदृढ ठेवण्यासाठी काय करायला हवं हे तुम्हालाही माहीत असेलच पण प्रश्न असा असतो की जे करायचंय ते करायचं कसं? आपल्या कामाच्या गडबडीत आपल्याला आपल्या आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष देता येत नाही. शरीरासाठी पाण्याची नितांत गरज असते. पण हे पाणी दिवसभरातून कोणत्या वेळी पिले पाहिजे याकडेही लक्ष देता येत नाही. अशा वेळी वेळापत्रक तयार करणे किंवा साधारण कधी काय करायचं याचा शेड्युल बाळगणे खूप मदतीचे ठरते. आज आपण यानुसारच पाणी पिण्याच्या बेस्ट वेळा कोणत्या हे पाहणार आहोत.

सकाळी उठल्यानंतर पाणी प्यायल्याने तुमचे अंतर्गत अवयव सक्रिय होण्यास मदत होते. यामुळे झोपेदरम्यान मंदावलेले तुमचे चयापचय पुन्हा सुरू होते, शरीर हायड्रेट होते आणि विषारी घटकांचे उत्सर्जन करण्यासाठी मदत होते. तुम्ही व्यायाम करता तेव्हा तुमच्या शरीरातील पाणी घामाने कमी होते. कसरत केल्यानंतर पाणी प्यायल्याने शरीरातून गमावलेले द्रव भरून काढण्यास मदत होते, हायड्रेशनची पातळी स्थिर होते आणि तुमचे हृदय सामान्य गतीत येते. स्नायूंची पुनर्प्राप्ती व डिहायड्रेशन थांबवणे असे दुहेरी हेतू यातून साधता येतात.

जेवणाच्या अर्धा तास आधी पाणी प्यायल्याने पचनास मदत होते. जेवणाच्या अर्धा तास आधी पाणी प्यायल्याने पाचक एन्झाईम्सचे उत्पादन उत्तेजित होऊन अन्नासाठी पोट तयार होते. शिवाय पाण्यामुळे पोट काही प्रमाणात भरलेले राहून पोर्शन कंट्रोलसाठी (प्रमाणात जेवण) मदत होऊ शकते. अंघोळ करण्यापूर्वी पाणी प्यायल्याने रक्तदाब कमी होण्यास मदत होते. अंघोळीपूर्वी पाणी प्यायलायने तुमचे रक्त तात्पुरते पातळ होऊ शकते ज्यामुळे हृदयाला रक्त पंप करणे सोपे होते. मात्र हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, जर तुम्हाला उच्च रक्तदाब असेल तर हा वैद्यकीय उपचारांचा पर्याय नाही, यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे अनिवार्य आहे.

झोपण्यापूर्वी पाणी प्यायल्याने दिवसभरातील द्रवपदार्थाची कमतरता भरून निघते. झोपेदरम्यान शरीरात अनेक क्रिया घडत असतात त्यावेळी लागणारी ऊर्जा पाण्याच्या माध्यमातून पुरवता येऊ शकते तसेच यामुळे हायड्रेशन पातळी राखण्यात मदत होते. काहींना सकाळी उठताच तोंड कोरडे पडणे किंवा डोकेदुखीचा त्रास असतो यासाठी झोपेपूर्वी किमान ग्लासभर पाणी पिणे आरामदायक ठरू शकते. अनेकदा डिहायड्रेशनमुळेच थकवा जाणवू शकतो. जेव्हा तुम्हाला थकल्यासारखे वाटत असेल तेव्हा पाणी पिणे तुमच्या शरीराला हायड्रेट करण्यात मदत करू शकते आणि उर्जा वाढवते. थकवा टाळण्यासाठी दिवसभर हायड्रेट राहणे महत्वाचे आहे.

तुम्ही आजारी असता तेव्हा हायड्रेशन महत्वाचे असते कारण ते तुमच्या शरीराच्या नैसर्गिक कार्यांना सुरळीत करण्यासाठी मदत करते. पाणी प्यायल्याने शरीराचे योग्य तापमान राखण्यास मदत होते. एकाप्रकारे शरीराला वंगण घालण्यास, पचनास आणि पेशींमध्ये पोषक सत्व आणि ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यास सुद्धा मदत होते.