राज्य मंडळाच्या शाळांमधील अभ्यासक्रमात मनाचे श्लोक आणि भगवद्गीता

राज्य मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना भाषा विषयांच्या अध्ययनात मनाचे श्लोक आणि भगवद्गीतेचा बारावा अध्याय पाठ करावा लागणार आहे. याशिवाय मूल्ये आणि स्वभाववृत्ती या घटकांची ओळख करून देण्यासाठी मनुस्मृतीतील श्लोकाचा वापर करण्याचा निर्णय वादग्रस्त ठरू शकतो.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्याचा शालेय अभ्यासक्रम आराखडा ‘एससीईआरटी’ने जाहीर केला आहे.  भाषा विषयांच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना मनाचे श्लोक आणि भगवद्गीतेचा अध्याय पाठ करायला लावावा असे सूचवण्यात आले आहे. तिसरी ते पाचवीपर्यंत एक ते २५ मनाचे श्लोक, सहावी ते आठवीसाठी २६ ते ५० मनाचे श्लोक आणि नववी ते बारावीसाठी भगवद्गीतेतील बारावा अध्याय यांचे पाठांतर करण्याची स्पर्धा आयोजित करण्यात यावी, अशी सूचना देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे भगवद्गीतेतील ज्ञानयोग, आत्मज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग यांची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यात यावी. भारतीय ऋषींची दीनचर्या कशी होती, आहार कसा होता, गुरुशिष्य परंपरा यांचीही ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. विज्ञान, गणित या विषयांमध्येही भारतीय ज्ञान प्रणालीचा समावेश करण्याचे आराखड्यात नमूद करण्यात आले आहे.

राज्यात मराठीव्यतिरिक्त इतर माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, आराखड्यात त्याबाबत स्पष्ट तरतूद नाही. मराठी व्यतिरिक्त इतर भाषा माध्यमांच्या शाळांमधील भाषा निवडीचे पर्याय कसे असावेत यांबाबतही संभ्रम आहे. म्हणजे एक भाषा विषय हा स्थानिक भाषा असावा अशी अपेक्षा आहे. इतर एक किंवा दोन भाषा उपलब्ध पर्यायांमधून निवडण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यात मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रथम भाषा मराठी असणे साहजिक आहे. मात्र, इंग्रजी, हिंदी, उर्दू, कन्नड, पंजाबी, सिंधी, तमीळ भाषा माध्यमांच्या शाळाही राज्यात आहेत. त्या शाळांमध्ये प्रथम भाषा स्थानिक म्हणजे मराठी की ज्या माध्यमाची शाळा आहे ती याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या नाहीत. नव्या अभ्यासक्रम आराखड्यात ऋषींची दिनचर्या, आहार, गुरुशिष्य परंपरा यांचीही ओळख विद्यार्थ्यांना करून देण्याची अपेक्षा आहे.

विविध स्तरांवर अभ्यासक्रम कसा असावा याची मांडणी वेगवेगळ्या घटकांच्या आधारे आराखड्यात करण्यात आली आहे. त्यातील मूल्ये आणि स्वभाववृत्ती या घटकाची सुरुवात मनुस्मृतीतील श्लोकाने केली आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.