कोल्हापूर प्रतिनिधी : आमचे मार्गदर्शक आणि जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आमदार पी. एन. पाटील यांचे निधन हा माझ्यासाठी फार मोठा धक्का आहे. अशी दुःखद प्रतिक्रिया भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.
शब्दाला आणि विचारांना पक्के, ध्येयनिष्ठ आणि तत्वनिष्ठ, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आपलेसे वाटणारे सुसंस्कृत आणि संयमी नेतृत्व म्हणजे पी. एन. पाटील. आजवरच्या माझ्या राजकीय प्रवासात त्यांनी नेहमीच मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावली. सर्वपक्षीयांशी मैत्रीचे संबंध ठेवताना, ते स्वतः काँग्रेसशी एकनिष्ठ राहिले. जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावरही त्यांचा मोठा प्रभाव होता. अनेक सहकारी संस्था त्यांनी उत्तमरीत्या चालवल्या. कुणाच्याही अडीअडचणीला धावून जाणारे आमदार पी. एन. पाटील आज आपल्यात नाहीत, यावर विश्वास बसत नाही. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली..! संपूर्ण पाटील परिवाराच्या दुःखात महाडिक परिवार सहभागी आहे.