वाकरेत 7 जून पासून करवीर महोत्सव

कोगे, प्रतिनिधी : खरेदीची धमाल, फूड स्टॉल, मनोरंजनाबरोबरच विविध स्पर्धा एकाच शताखाली घेऊन साजरा होणारा करवीर महोत्सव याचे आयोजन 7 ते 10 जून या कालावधीत विठाई चंद्राई हॉल वाकरे फाटा येथे केले असल्याची माहिती व्हिजन ट्रस्टचे अध्यक्ष संताजीबाबा घोरपडे यांनी बैठकीत दिली.

यावेळी बैठकीत घोरपडे म्हणाले, यावर्षी पुन्हा एकदा बचत गटातील महिलांना मोफत स्टॉल देणार आहेत. महिलांच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळावी या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. तसेच महिलांमध्ये कलागुणांना वाव मिळावा यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील नियोजन केले जाते. तसेच पंचक्रोशीतील इतर व्यवसायिकांना आपल्या व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने सुद्धा येथे व्यवसायिक स्टॉलची उभारणी करण्यात येणार आहे. महोत्सवाच्या निमित्ताने रांगोळी, मेहंदी, पाककला, मेकअप, वेशभूषा स्पर्धा, रेकॉर्ड डान्स, गाण्यांची स्पर्धा, झिम्मा फुगडी स्पर्धा इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी विनामूल्य प्रवेश असून आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहे.