कोल्हापूर प्रतिनिधी : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि करवीरचे आमदार पी. एन. पाटील यांचे आज (गुरुवार) पहाटे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे कोल्हापुरवर शोककळा पसरली आहे. सकाळी १० वाजता पार्थिव अंत्यदर्शनासाठी काँग्रेस कमिटी येथे आणण्यात येणार आहे. ११ वाजता सडोली येथे नेण्यात येणार आहे. दुपारी १ वाजता अंतिम संस्कार होणार आहेत.
आमदार पी. एन. पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीने अॅस्टर आधार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुंबई व कोल्हापूर येथील विशेष वैद्यकीय तज्ज्ञांनी त्यांच्यावर त्वरित शस्त्रक्रिया केली होती. गेल्या आठवडाभरापासून त्यांना कमी रक्तदाबाचा त्रास सुरू होता.
रविवारी सकाळी बाथरूममध्ये चक्कर येऊन ते कोसळले. त्यांच्या डोक्याला व हाताला गंभीर मार लागल्याने त्यांना तातडीने अॅस्टर आधार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुंबईतील तज्ज्ञ डॉक्टर विशेष विमानाने कोल्हापुरात आले. कोल्हापूर व मुंबईतील तज्ज्ञ डॉक्टरांनी आमदार पाटील यांच्यावर शस्त्रक्रिया केली होती. त्यानंतर प्रकृती गंभीर होती, आज सकाळी त्यांचे निधन झाले.