विराट कोहलीच्या जीवाला धोका

अहमदाबादमध्ये राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील एलिमिनेटर सामन्यापूर्वी धक्कादायक बातमी समोर आली आहे. बुधवार, २२ मे रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर राजस्थान आणि बंगळुरु या दोन संघांमध्ये एलिमिनेटर सामना खेळला जाणार आहे, परंतु त्याच्या एक दिवस आधी, आरसीबीने त्यांचे एकमेव सराव सत्र रद्द केले. विराट कोहलीसह संपूर्ण संघाच्या सुरक्षेला लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. सोमवार, २० मेच्या रात्री अहमदाबादमध्ये पोलिसांनी दहशतवादी कारवायांच्या संशयावरून चार जणांना अटक केली होती, त्यानंतर आरसीबीने सुरक्षा लक्षात घेऊन हा निर्णय घेतला.

आरसीबीने कोणतेही कारण न देता मंगळवारी नियोजित सराव रद्द केला आहे. केवळ सरावच नाही तर पत्रकार परिषदही रद्द करण्यात आली. मंगळवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या पहिल्या क्वालिफायर सामन्यामुळे आरसीबी आणि राजस्थान गुजरात कॉलेज मैदानावर सराव करणार होते पण आरसीबीने तो रद्द केला.

गुजरात पोलिसांचा असा विश्वास आहे की विराट कोहलीसारख्या मोठ्या क्रिकेटपटूच्या सुरक्षेचा विचार करून फ्रँचायझीने सराव रद्द करण्याचा निर्णय घेतला. अहमदाबादमध्ये कोहलीसह भारतातील आणि जगातील अनेक क्रिकेटपटूंच्या उपस्थितीत संशयितांची अटक आणि त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या शस्त्रास्त्रांनी सुरक्षा यंत्रणांना सतर्क केले होते. अशा परिस्थितीत पोलिसांनी दोन्ही संघांना याबाबत माहिती दिली, त्यानंतर आरसीबीने सराव रद्द केला, तर राजस्थानने मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. असा दावा करण्यात आला आहे.

एवढ्या मोठ्या सामन्यापूर्वी सराव न करणे हे आकलनापलीकडचे आहे. कोहलीलाही ४ जणांच्या अटकेची माहिती मिळाली आणि अशा परिस्थितीत त्यांचे संरक्षण करणे ही पोलीस दलाची सर्वात मोठी प्राथमिकता आहे. आरसीबी व्यवस्थापनाला अशा परिस्थितीत कोणताही धोका पत्करायचा नव्हता आणि त्यामुळेच कदाचित हा निर्णय घेण्यात आला असावा, असा दावा पोलीस अधिकाऱ्याने केला. राजस्थानचा विचार केला तर संघाचा कर्णधार संजू सॅमसनसह अनेक खेळाडू सरावासाठी आले होते, मात्र यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त होता आणि पोलीसही मैदानावर फिरत होते.