गजानन कीर्तिकर यांची पक्षातून त्वरित हकलपट्टी करा : शिशिर शिंदे

गजानन कीर्तिकर यांना मातोश्रीवर लोटांगण घालायची घाई झालेली दिसते. पण, कीर्तिकरांचे हे उद्योग आपल्या पक्षाला आणि मुख्य नेते म्हणून आपल्याला बदनाम करत आहेत, खूप झाले आता, असा संताप व्यक्त करत शिवसेना उपनेते शिशिर शिंदे यांनी गजानन कीर्तिकर यांची पक्षातून त्वरित हकलपट्टी करण्याची मागणी केली आहे. 

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते गजानन कीर्तिकर यांनी केलेल्या विधानामुळे पक्षातच वाद निर्माण झाला आहे. गजानन कीर्तिकर हे सातत्याने आपल्याच सरकारला घरचा आहेर देताना दिसत आहे. केंद्रीय यंत्रणांच्या चौकशीच्या मुद्द्यावरून कीर्तिकरांनी लक्ष्य केलं होतं. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांचा अनुभव व ७८ वर्षांचे वय पाहून आपण त्यांचा अत्यंत योग्य सन्मान राखला. त्यांना व्यासपीठावर आपल्या बाजूचे आसन कायम दिले.

लोकसभेसाठी गजानन कीर्तिकर यांचे पुत्र अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी अधिकृतपणे उबाठा पक्षातर्फे जाहीर झाली आणि गजाभाऊ आकंठ पुत्रप्रेमाने अक्षरशः आंधळे झाले गेली सुमारे वर्षभर गजाभाऊ त्यांचा सर्व शासकीय निधी व यंत्रणा अमोल कीर्तिकर यांच्या सल्ल्याने व पुढाकाराने विनियोग करत होते. एकाच कार्यालयात बसून कीर्तिकर पितापुत्र पक्ष चालवत होते. त्यात शिवसेनेला शून्य लाभ होता, मात्र उबाठाला प्रत्यक्षात फायदा होत होता.

ऐन मतदानाच्या दिवशी गजाभाऊंच्या पत्नीने तुमचा एकेरी उल्लेख करत जाणूनबुजून अपमान करत त्वेषाने प्रतिस्पर्धी उबाठाची बाजू घेतली. गजाभाऊ मूक साक्षीदार बनले होते.आज गजाभाऊ कीर्तिकरांनी पुत्रप्रेमाचे ओंगळवाणे राजकीय प्रदर्शन करत तुमची निंदा केली. गजाभाऊ आपल्या पक्षातून बाहेर पडून मातोश्रीचे लाचार व्हायचा प्रयत्न करीत आहेत. यापूर्वी शिवसेना नेते रामदास कदम यांच्याशी जाहीर भांडण केले. कर्तृत्ववान सिद्धेश कदम यांचे पंख कापण्याचे काम गजानन कीर्तिकरांनी केलेले आहे.

एकूणच कीर्तिकरांना मातोश्रीवर लोटांगण घालायची घाई झालेली दिसते. पण, कीर्तिकरांचे हे उद्योग आपल्या पक्षाला व मुख्य नेते म्हणून आपल्याला बदनाम करत आहेत. आता बस्स! शिंदे साहेब, गजानन कीर्तिकर यांची पक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल पक्षातून त्वरित हकालपट्टी करावी. त्यांना निरोपाचा नारळ द्यावा. अशी मागणी शिशिर शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांना केली आहे.