देशात नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील : महादेव जानकर

लोकसभा निवडणुकीच्या एकूण सात टप्प्यांपैकी पाच टप्प्यातील मतदान पार पडले असून आणखी दोन टप्प्यातील मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील पाचही टप्प्यांतील मतदान झालेले आहे. परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे महादेव जानकर आणि महाविकास आघाडीचे संजय जाधव हे आमने-सामने होते. ४ जून रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. मात्र, याआधी महादेव जानकर यांनी एक मोठं विधान केलं आहे.

महाराष्ट्रात ४८ जागांपैकी महायुतीला ४२ जागा मिळतील आणि महाविकास आघाडीला फक्त ६ जागा मिळतील, असा दावा महादेव जानकर यांनी केला आहे. “परभणीची निवडणूक पार पडल्यानंतर मी महाराष्ट्रात जवळपास ५५ सभा घेतल्या आहेत. या सभांच्या माध्यमातून महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी वेळ दिला. आता मतदान संपल्यानंतर माझ्या मतदारसंघात येवून मतदारसंघातील पाण्याच्या प्रश्नासंदर्भासह आदी प्रश्नासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना काही सूचना केल्या आहेत. आचारसंहिता संपल्यानंतर परभणीच्या कामांचे प्रश्न पहिल्या कॅबिनेटमध्ये घेण्यात यावे, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे प्रयत्न करणार आहे”, असं महादेव जानकर म्हणाले.