केकेआर संघ आयपीएलच्या इतिहासात चौथ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. कोलकाता नाइट रायडर्सने पहिल्या क्वालिफायर सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा पराभव करून अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. आता अंतिम सामना २६ मे रोजी होणार आहे. क्वालिफायर सामना पाहण्यासाठी संघाचा मालक शाहरुख खान देखील अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिमयवर उपस्थित होता. शाहरुख आपली मुलगी आणि मुलासोबत सामना पाहण्यासाठी आला होता. केकेआरच्या विजयानंतर शाहरुखने अहमदाबादच्या स्टेडियममधील मैदानात फिरून चाहत्यांचे आभार मानले.
चाहत्यांचे आभार मानत असतानाच शाहरुखकडून एक चूक झाली. मैदानावर फेरी मारत असताना शाहरुख खान समालोचकांच्या कार्यक्रमाच्या मध्ये जाऊन पोहोचला. चाहत्यांना हात दाखवत असतानाच त्याला कळलंच नाही की आपण कधी लाइव्ह कार्यक्रमाच्या मध्ये पोहोचलो आहोत. शाहरुखला आपली चूक लक्षात येताच त्याने तात्काळ समालोचक आकाश चोप्रा, सुरेश रैना आणि पार्थिव पटेल यांची माफी मागितली आणि त्यानंतर त्यांनी किंग खानला मिठी मारून कृतज्ञता व्यक्त केली.
तर शाहरूखच्या पुढे असलेले सुहाना आणि अब्राहमसुध्दा लाइव्ह कार्यक्रमात जाता जाता मागे फिरले आणि त्यांनीही माफि मागितली. पण शाहरूखने जाताना देखील हात जोडून त्याच्याकडून अनावधानने झालेल्या चुकीची माफी मागितली, ज्यामुळे सर्वांचं मन जिंकलं आहे. आकाश चोप्रा, सुरेश रैनाही शाहरूखचे कौतुक करताना दिसले. समालोचकांच्या माईकवरून शाहरूख माफी मागत असल्याचे पाहायला मिळाले.