आयुर्वेदातील अमृतपेय ‘ताक’

शरीरातील उष्णता आणि दाह कमी करण्यासाठी ताक एखाद्या औषधाप्रमाणे काम करतं. त्यामुळे उन्हाळ्यातील आहारात  ताकाचा आवर्जून समावेश केला जातो. ताक पिण्याचे अनेक फायदे आरोग्यावर होतात. आयुर्वेदात तर ताकाला अमृतपेय असं म्हटलं जातं. कारण ताकामुळे तुमच्या शरीरातील टॉक्सिन्स अर्थात विषद्रव्ये बाहेर टाकली जातात. जाणून घेऊया ताक पिण्यामुळे आरोग्यावर काय चांगला परिणाम होतो.

ताक हे थंड पेय असल्यामुळे ते प्यायल्यामुळे शरीराला त्वरीत थंडावा मिळतो. उन्हाळ्यात शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. एक ग्लास ताकात जिरे पावडर, पुदिना, कोथिंबीर आणि मीठ मिसळून प्यायल्यामुळे तुमची तहान लगेच भागते. शिवाय बाहेरील उष्ण वातावरणामुळे शरीरात निर्माण झालेली उष्णता कमी होण्यास मदत होते.

दह्यामध्ये भरपूर पाणी टाकून ते बराच वेळ घुसळण्यामुळे ताक निर्माण होते. त्यामुळे दह्यापेक्षा ताकामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. ताकामध्ये नव्वद टक्के पाणी आणि पोटॅशिअमसारखे इलेक्ट्रोलेट असतात. ज्यामुळे तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. शरीराला सर्व कार्य सुरळीत करण्यासाठी पाण्याची गरज असते. जेव्हा शरीरातील पाण्याची पातळी कमी होते तेव्हा डिहायड्रेशनचा धोका निर्माण होतो. मात्र जर तुम्ही नियमित ताक पित असाल तर तुमचे शरीर सतत हायड्रेट राहते आणि डिहाड्रेशन होत नाही.

बऱ्याचदा बाहेरचे अपथ्यकारक पदार्थ खाण्यामुळे अथवा अती प्रमाणात तेलकट, मसालेदार पदार्थ खाण्यामुळे तुम्हाला अॅसिडिटीचा त्रास जाणवतो. ज्यामुळे पोटदुखी, छातीत जळजळ, पोटात गॅस पकडणे असे त्रास होतात. मात्र यावर सोपा उपाय हा की एक ग्लास ताकामध्ये काळी मिरी पावडर आणि धणे पावडर मिसळून पिणे. कारण ताकातील लॅक्टिक अॅसिड तुमच्या पोटातील अॅसिडिटी कमी करते आणि धणे पावडर आणि ताकाचा थंडावा छातीत होणारी जळजळ कमी करते.

शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू लागल्यास रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे ह्रदयावर ताण येऊन ह्रदयविकार होतात. मात्र जर तुम्ही नियमित ताक पित असाल तर तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. ज्यामुळे ह्रदयविकारांचा धोका टाळता येतो. निरोगी ह्रदयासाठी नियमित एक ग्लास ताक पिणे फायदेशीर ठरेल.

आजकाल कामाची दगदग, चिंता, काळजी याचा परिणाम आरोग्यावर होताना दिसत असतो. बऱ्याचदा मानसिक ताणामुळे रक्तदाब वाढतो आणि हायपटेंशन, ह्रदयविकाराच्या समस्या वाढू लागतात. मात्र जर तुम्ही दररोज ताक पित असाल तर तुमचा रक्तदाब कमी होतो. कारण ताकामध्ये रक्तदाब नियंत्रित ठेवणारे पोटॅशिअम असते. यासाठीच उच्च रक्तदाब असणाऱ्या लोकांच्या आहारात ताक असायलाच हवे. ताकामुळे तुम्हाला ऊर्जा तर मिळतेच शिवाय आजारपणातून वाचण्यासाठी तुमच्या शरीरात पुरेशी प्रतिकारशक्तीही निर्माण होते.

ताक नियमित पिण्याची सवय फक्त तुमच्या आरोग्यासाठीच नाही तर तुमच्या सौंदर्यासाठीही चांगली आहे. ताक पिण्यामुळे तुमच्या त्वचेवरील टॅनिंगचे डाग, काळे डाग, पिंपल्सचे व्रण आणि काळसरपणा कमी होतो. ताक तुमच्या त्वचेला आतून मॉस्चराईझ करते, त्वचा चमकदार करते आणि तुम्हाला चिरतरूण ठेवते. ताकामुळे तुम्हाला डागविरहित त्वचा मिळू शकते.

ताक हे प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचे खूप चांगले स्त्रोत आहे. शिवाय त्यात कॅलरिज आणि फॅट्स कमी असतात. ताक पिण्यामुळे तुमचे पोट बराच वेळ भरल्यासारखे राहते. शिवाय त्यामुळे तुम्हाला हायड्रेटेड आणि उत्साही वाटू लागते. ज्यामुळे तुम्ही दिवसभरात अनावश्यक पदार्थ कमी  प्रमाणात खाता. ज्याचा परिणाम तुमच्या वजनावर होतो.  कारण ताकामुळे तुमचे वजन तर कमी होतेच शिवाय तुमचे  पोषणही योग्य प्रमाणात होते.