काही कारणांमुळे शेतकरी सन्मान निधी योजनेतून नाव होऊ शकते गायब

पीएम शेतकरी सन्मान योजना ही अशी योजना आहे, जिच्या माध्यमातून केंद्र सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत करते. मिळालेल्या या आर्थिक मदतीतून शेतकरी शेतीसाठी आवश्यक असणारे सामान, बी-बियाणे खरेदी करतात. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठवली जाते. या योजनेचे देशात साधारण 11 कोटी लाभार्थी आहेत. आतापर्यंत या योजनेअंतर्गत साधारण 3 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी शेतकऱ्यांना देण्यात आलेला आहे.

मात्र या योजनेचा लाभ घेण्याआधी शेतकऱ्यांना त्यासाठी रितसर अर्ज करावा लागतो. हा अर्ज भरताना काही चूक झाल्यास शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही.यासह या योजनेच्या काही अटी आहे. या अटींची पूर्तता न झाल्यास शेतकऱ्यांचा अर्ज फेटाळला जातो. या अटी वेगवेगळ्या आहेत. ज्या कुटुंबात अगोदरपासूनच पीएम शेतकरी सन्मान निधी योजनाचा एक लाभार्थी आहे, त्या कुटंबातील दुसऱ्या व्यक्तीचा अर्ज फेटाळण्यात येतो. या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर अर्जदाराला 01-02-2019 रोजी अठरा वर्षे पूर्ण झालेली असायला हवीत. तसे नसेल तर या योजनेचा अर्जदाराला लाभ मिळत नाही.

ज्या कुटुंबातील एखादा सदस्य सरकारी नोकर, सरकारशी संलग्न असलेली संस्था यांच्यात नोकरीला असेल तर या योजनेचा लाभ मिळत नाही. एखाद्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने गेल्या वर्षी प्राप्तिकर भरलेला असेल तर अशा स्थितीत अर्जदाराला पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत नाही.

एखाद्या कुंटुबातील कोणताही सदस्य डॉक्टर, इंजिनिअर, सीए, आर्किक्टेट यांच्याशी संबंधित संस्थेचा नोंदणीकृत सदस्य असेल तर त्या कुंटुंबातील व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळत नाही.