राज्यात मुख्यमंत्रीपदावरुन जोरदार चर्चा सुरु आहे. एकीकडे मुख्यमंत्री होण्याची सुप्त इच्छा उद्धव ठाकरे यांच्या मनात पूर्वीपासूनच होती असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं.
पण बहुमत असतानाही देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होता आल नाही असा आरोप विरोधकांकडून होत आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्याने फडणवीस नाराज झाल्याची चर्चा देखील सुरु होती. मात्र आता शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री केलं, तरी आम्ही त्या निर्णयासोबत असू असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले.
विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी महायुतीचे घटक पक्ष एकत्रित निवडणूक लढतील आणि त्यात भाजप मोठ्या भावाची भूमिका बजावेल, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी केली होती.विधानसभा निवडणुकीत महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. “याबद्दल स्पष्टता केली जाऊ शकते किंवा केलीही जाणार नाही. मी यामुळे म्हणतोय की, भाजपची स्ट्रॅटजी आहे. आसाम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यात आपण बघितलं आहे. भाजप विधानसभेची निवडणूक अनेकदा बिनचेहऱ्याची लढते. अनेकदा चेहरा देऊन लढते. याचा निर्णय भाजपचे संसदीय मंडळ घेते,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“भाजप सर्वात मोठा पक्ष आहे महायुतीतही सर्वात मोठा पक्ष राहणार आहे. पण, याचा अर्थ असा नाही की, सर्वात मोठा पक्ष आहे म्हणून आमचाच मुख्यमंत्री बनेल. मुख्यमंत्री कोण होणार, याचा निर्णय आमच्या सोबतच्या पक्षासोबत चर्चा करून आणि आमचे केंद्रीय नेतृत्व घेईल. एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला तरी आम्ही त्या निर्णयासोबत असू”, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.