‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ हा चित्रपट वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित असून, प्रेक्षकांना हा चित्रपट लवकरच घरी बसून पाहता येणार आहे. हा चित्रपट २२ मार्च रोजी हिंदी व मराठी भाषेत प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता दोन महिन्यांनी या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची तारीख ठरली आहे.
‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटात रणदीप हुड्डाने वीर सावरकर यांची भूमिका साकारली होती. मुख्य भूमिका करणाऱ्या रणदीपने चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुराही सांभाळली. या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने दिग्दर्शनात पदार्पण केलं आहे. या चित्रपटात अंकिता लोखंडे व अमित सियाल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात केली होती, पण चित्रपटाला बजेटपेक्षा जास्त कमाई करण्यात यश आलं. थिएटर्सनंतर हा चित्रपट आता ओटीटीवर पाहता येणार आहे.
‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ हा चित्रपट झी ५ वर २८ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अंकिता लोखंडेने सावरकरांच्या पत्नी यमुनाबाईंची भूमिका केली होती. डिजिटल रिलीजबद्दल रणदीप एका निवेदनात म्हणाला, “मी झी ५ वर स्वातंत्र्य वीर सावरकर चित्रपटाच्या जागतिक डिजिटल प्रीमियरची वाट पाहत आहे. भारतीय सशस्त्र क्रांतीच्या सर्वात प्रभावशाली क्रांतिकारकावरील चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी त्यांच्या १४१ व्या जयंतीहून चांगला दिवस असूच शकत नाही.”
“मी या चित्रपटावर काम करण्यास सुरुवात केल्यानंतर या प्रेरणादायी नायकाबद्दल मला बरंच काही शिकायला मिळालं. त्यांचा वारसा मिटवण्यासाठी पसरवलेल्या खोट्या गोष्टींना उत्तर म्हणून मला हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. मी प्रत्येक भारतीयाला विनंती करतो की त्यांनी भारतीय इतिहासातील माहित नसलेल्या गोष्टी जाणून घेण्यासाठी हा चित्रपट पाहावा आणि वीर सावरकर हे खरंच वीर होते की नाही ते स्वतःच ठरवावं,” असं हुड्डा रणदीप हुड्डाने नमूद केलं.