रस्ते कामावरुन कार्यकर्त्यांचा नेत्रदीप सरनोबत यांच्यावर प्रश्नांचा भडीमार

कोल्हापूर : शहरातील खराब रस्त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. रस्ते कामासाठी शंभर कोटी रुपये मंजूर असूनही शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी विलंब का ? पालकमंत्र्यांच्या एजंटरुपी दोन कार्यकर्त्यांना शंभर कोटी रुपयांचा रस्ते कामाचा उपठेका मिळवण्यासाठी मुख्य ठेकेदारावर दबाव असल्याची चर्चा खरी आहे का? एक एजंट शहरातील पदाधिकारी तर दुसरा शहरालगतच्या गावातील आहे म्हणतात, हे खरे असेल तर नावे जाहीर करा. अशी आक्रमक भूमिका कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेतील आयोजित बैठकीत घेतली.
कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर बोलताना प्रकल्प व्यवस्थापक सत्तार मुल्ला यांनी, आपल्यावर कोणाचा दबाव नाही. कोणालाही उपठेकेदार म्हणून कामे दिली नाहीत असा खुलासा केला. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत शहरातील सोळा रस्त्यासाठी शंभर कोटी रुपये मंजूर आहेत. जानेवारी महिन्यात वर्क ऑर्डर दिली आहे. सोळापैकी पाच रस्त्यांची कामे सुरू आहेत. रस्त्यांची कामे संथगतीने व नियमानुसार होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी रस्ते कामावरुन प्रश्नांचा भडीमार केला. ठेकेदार एव्हरेस्टचे प्रतिनिधी व प्रकल्प सल्लागार सत्तार मुल्ला यांनी ३१ मे पर्यंत पाच रस्त्यांची कामे पूर्ण होतील असे सांगितले.
कृती समितीचे पदाधिकारी अशोक पोवार व रमेश मोरे यांनी, ’शंभर कोटी अंतर्गत रस्ते कधीपर्यंत पूर्ण होणार ? रक्कम मंजूर असूनही कामे संथगतीने का होत आहेत ? पालकमंत्र्यांच्या एजंटरुपी दोन कार्यकर्त्यांना रस्ते कामाचा उपठेका पाहिजे आहे, म्हणून दबाव टाकला जात असल्याची चर्चा आहे, ते खरं आहे का ?’ अशी विचारणा केली. त्यावर प्रकल्प सल्लागार मुल्ला यांनी कोणताही दबाव नसल्याचे सांगितले. रस्ते चांगले झाले पाहिजेत नाही तर गाठ कोल्हापूरकरांशी आहे असा इशारा मोरे यांनी दिला.
अर्बन बँकेचे संचालक संभाजी जगदाळे, कादर मलबारी, प्रकाश आमते आदींनी चर्चेत सहभाग घेतला. बैठकीला जल अभियंता हर्षजित घाटगे, उपशहर अभियंता महादेव फुलारी, सतीश फप्पे, आर. के. पाटील, रमेश कांबळे, कनिष्ठ अभियंता अमित दळवी, निवास पोवार, सागर शिंदे, सल्लागार ए. व्ही. कसबेकर, उपस्थित होते.