खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचाराची मिरवणूक नांदिवली स्वामी समर्थ मठ ते एमआयडीसी भागात आयोजित केली होती.यावेळी मुसळधार पाऊस सुरू झाला. या पावसात मुख्यमंत्री मिरवणुकीत सहभागी झाले होते.हा मुसळधार पाऊस म्हणजे आपल्या विजयाची सलामी आणि मोठ्या मताधिक्याची चाहूल आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर आपली जी हिंदुत्वाची विचारधारा जपली. या माध्यमातून शिवसेना वाढवली. त्या हिंदुत्वाच्या विचारधारेला मूठमाती देण्याचे काम आता सुरू आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली.पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “यांना बाळासाहेबांची विचारधारा राहिली नाही. सावरकरांची बदनामी यांना चालते. सावरकरांची बदनामी करणाऱ्यांच्या मांडीजवळ हे बसतात. औरंगजेबाची बाजू हे घेतात. बॉम्बस्फोटातील याकूब मेमन यांच्या कबरीचे उदात्तीकरण हे करतात. यांच्या प्रचार मिरवणुकीत पाकिस्तानचे झेंडे फडकवले जातात तरी हे मौन बाळगून आहेत. काश्मीर विषयावर नेहमीच विरोधी भूमिका घेणारे फारुख अब्दुल्ला यांच्या मांडीला मांडी लावून बसतात.” “अशा या सर्व विरोधी, नकारात्मक वातावरणात यांचा वावर सुरू आहे. अशा वातावरणात हे कसे जपतील बाळासाहेबांची हिंंदुत्ववादी विचारधारा. यांनी बाळासाहेबांच्या विचारधारेला मूठमाती देण्याचे काम केले आहे”, असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला. मिरवणुकीत खासदार डॉ. शिंदे, मंत्री संजय राठोड, खा. श्रीरंग बारणे, शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे सहभागी झाले होते.