परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ या मराठी चित्रपटाची जोरदार चर्चा चालू आहे. या चित्रपटाचं सुंदर कथानक घराघरांतल्या प्रत्येक महिलेला भावलं. चित्रपटाने प्रदर्शित झाल्यावर पहिल्या दोन दिवसांतच बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग केली होती. आतापर्यंत ‘नाच गं घुमा’ने बॉक्स ऑफिसवर जवळपास १६ कोटींहून अधिक गल्ला जमवला आहे. मराठी बॉक्स ऑफिस गाजवल्यावर आता ‘नाच गं घुमा’ थेट परदेशवारीवर जाणार आहे.
मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव यांच्या ‘नाच गं घुमा’ या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. या दोघींच्या अफलातून जुगलबंदीची सध्या सर्वत्र चर्चा होताना दिसते. याशिवाय ‘नाच गं घुमा’ला एकूण ६ निर्माते लाभले आहेत. स्वप्नील जोशी, शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई, परेश मोकाशी, मधुगंधा कुलकर्णी आणि तृप्ती पाटील यांनी एकत्र मिळून या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आता संपूर्ण राज्यभरात कौतुकाची थाप मिळवल्यावर ‘नाच गं घुमा’ अमेरिकेत दाखवला जाणार आहे.