मुंबईच्या होर्डिंग दुर्घटनेमधून कोल्हापूर महापालिकेने बोध घ्यावा

कोल्हापूर, प्रतिनिधी – मुबई मध्ये नुकतीच होर्डिंग अंगावर पडून मोठी जीवित आणि वित्त हानी झाल्याची दुर्घटना घडली आहे, अशी दुर्घटना घडणे खरोखरच दुर्देवी आहे आणि ही कधीही न भरून निघणारी हानी आहे. मुंबईतील या घटनेचा बोध घेऊन कोल्हापूर महापालिकेने मानवी वस्तीमध्ये होर्डिंग लावण्यास परवानगी देऊ नये. या मागणीचे निवेदन गुरुवारी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना सादर करण्यात आले. 

जाहिरात होर्डिंग्ज माध्यमातून प्रशासनाला लाखो रुपयांचा महसूल जरी मिळत असला तरी वस्तीमध्ये लावण्यात आलेले धोकादायक स्थितीतील  होर्डिंग्ज मानवी जीविताला धोकादायक ठरू शकतात आणि नैसर्गिक संकट हे कुठेही आणि कधीही येऊ शकते, त्यामुळे संभाव्य जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी महापालिकेने सर्वसाधारण सभेमध्ये ठराव करून मानवी वस्तीमध्ये लावण्यात आलेली होर्डिंग काढून टाकण्याचा ठराव करावा, ज्याप्रमाणे इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येते, त्याच पद्धतीने वर्षानुवर्ष मोठमोठ्या बिल्डिंगवर घरांवर लावण्यात आलेल्या होर्डिंगचे देखील स्ट्रक्चर ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी समाजमन सामाजिक संस्था या निवेदनातून करत आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबई मधील गजबजलेल्या ठिकाणी भले मोठे होर्डिंग वाऱ्यामुळे खाली पडून 14 जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले. ही घटना दुर्दैवी आहे. जाहिरात होर्डिंग्जच्या माध्यमातून शासन, प्रशासनाला लाखो रुपयांचा महसूल प्राप्त होतो. हे खरे असले तरी मिळणाऱ्या महसूल पेक्षा लोकांचा जीव महत्त्वाचा आहे. जाहिरात होर्डिंग्ज हे अधिकतर मानवी वस्तीमध्ये गजबलेल्या ठिकाणी लावण्यात येतात. मुंबईतील घटना नैसर्गिक संकटामुळे निर्माण झाली आणि होर्डिंग अंगावर, गाड्यांवर पडून मोठी दुर्घटना घडली.

अशी घटना कदाचित उद्या कोल्हापूर व अन्य कोठेही घडू शकते. अशी अप्रिय घटना घडू नये. पण ती घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब विचारात घेऊन मुळात मानवी वस्तीमध्ये मोठमोठ्या बिल्डिंग आणि घरांवर होर्डिंग लावण्याची परवानगी देण्यात येऊ नये आणि सध्या लावलेले होर्डिंग्ज देखील पावसाळा सुरू होण्याच्या पूर्वी खाली उतरवावेत.

महापालिकेला जर मिळणाऱ्या महसुलावर पाणी सोडणे शक्य नसेल तर असे होर्डिंग जिथे तिथे लावली आहे त्यांचे प्रति वर्ष स्ट्रक्चर ऑडिट करावे. कारण बऱ्याच ठिकाणी लावलेल्या होर्डिंग्ज याचा ढाचा कमकुवत झालेला असू शकतो. त्याचा लोखंडी सापळा गंजून निकामी देखील होऊ शकतो. आणि पावसाळ्यात वादळी वारे निर्माण होऊन जर मुंबईसारखी एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा सर्वाधिक धोका होर्डिंग्ज लावलेल्या आसपासच्या परिसरातील नागरिकांना पोहोचू शकतो.

होर्डिंग्ज मधून मिळणाऱ्या महसूल पेक्षाही मानवी जीवन अनमोल आहे. याचा महापालिका प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा आणि समाजमन संस्थेने केलेल्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा अशी मागणी समाजमन संस्था संस्थापक अध्यक्ष महेश गावडे आणि सेक्रेटरी बाळासाहेब उबाळे यांनी या निवेदनातून केली आहे.

यावेळी संस्थाध्यक्ष महेश गावडे आणि सेक्रेटरी बाळासाहेब उबाळे, खजानीस सतीश वडनगेकर आदि उपस्थित होते.