6 जून रोजी सुनील छेत्रीचा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना

भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. छेत्री म्हणाला की, 6 जून रोजी कुवेत विरुद्ध फिफा वर्ल्ड कप पात्रता सामना हा त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना असेल. 39 वर्षीय सुनील छेत्रीने भारताकडून खेळताना अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

सुनील छेत्री हा भारतीय फुटबॉलचा महत्त्वाचा भाग होता. त्याने देशासाठी 150 सामन्यात 94 गोल केले. निवृत्तीची घोषणा करताना छेत्रीने आपल्या प्रवासाच्या आठवणी सांगितल्या आणि सांगितले की, मी माझा पहिला सामना खेळलो ते मला अजूनही आठवते. माझा पहिला सामना, माझा पहिला गोल, हा माझ्या प्रवासातील सर्वात संस्मरणीय क्षण होता. देशासाठी इतके सामने खेळू शकेन, असे मला कधीच वाटले नव्हते.

तो पुढे म्हणाला की, ‘मी प्रथम माझ्या आई-वडिलांना आणि पत्नीला या निर्णयाबद्दल सांगितले. माझे वडील खुश झाले पण आई आणि बायको रडायला लागल्या. मी आईला म्हणालो की, तू मला नेहमी म्हणत होता की मला खेळताना पाहून तुला खूप दडपण येतं पण आता तसं होणार नाही. मी भारतासाठी पुन्हा खेळणार नाही मग तू का रडत आहेस.

सुनील छेत्रीने 12 जून 2005 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तो पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळला. या सामन्यातच त्याने पहिला आंतरराष्ट्रीय गोलही केला. छेत्रीने त्याच्या शानदार कारकिर्दीत 6 वेळा एआयएफएफ प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार जिंकला. याशिवाय त्यांना 2011 मध्ये अर्जुन पुरस्कार आणि 2019 मध्ये पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले होते.