माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू व प्रशिक्षक जस्टीन लँगर हे यंदाच्या आयपीएलमध्ये लखनौ सुपर जाएंट्स संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहात आहेत. लखनौची यंदाच्या आयपीएलमधील सुरुवात दणक्यात झाली असली तरी आता प्रत्येक सरत्या सामन्यानंतर आयपीएलचे प्लेऑफ गाठण्याच्या संघाच्या आशा मावळताना दिसतायत. काही दिवसांपूर्वी अशाच एका सामन्यात संघाचा खेळ पाहून स्वतः लखनौ सुपर जाएंट्सचे मालक संजीव गोयंका सुद्धा कर्णधार केएल राहुलवर भडकले होते. यावर स्वतः एलएसजीचे मुख्य प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी स्पष्टीकरण देत हे शुल्लक वाद आहेत असं म्हणत संघात मतभेद नसल्याचे सांगितले आहे.
आयपीएल हे क्रिकेटइतकेच व्यवसायाचे माध्यम आहे असं म्हणताना जस्टीन यांना खेळाडूंना पटकन मिळणाऱ्या प्रसिद्धीविषयी प्रश्न करण्यात आला होता. “आयपीएलमध्ये पैसे वाहते असतात आणि त्यामुळे खेळाडू चटकन सुपरस्टार बनतात पण यामुळे त्यांच्यातील इगो मोठा होतो असं वाटतं का?” या प्रश्नावर उत्तर देताना जस्टीन यांनी रोहित शर्मा व धोनीसहित भारतीय खेळाडूंबाबतचे निरीक्षण नोंदवले आहे.
जस्टीन सांगतात की, मी ज्या ऑस्ट्रेलियन संघात खेळलो त्यामध्ये आमच्याकडे मॅथ्यू हेडन, शेन वॉर्न, ग्लेन मॅकग्रा, रिकी पाँटिंग होते. ते त्यांच्या कामगिरीमुळे सुपरस्टार खेळाडू होते, त्यांनी किती पैसे कमावले हा मुद्दा तितका महत्त्वाचा नव्हताच. आम्ही खेळाडूंना किती पैसे मिळतात यावर नव्हे तर कामगिरी पाहून न्याय करतो. एमएस धोनी हा त्याने खूप पैसे कमावले म्हणून एमएस धोनी झालेला नाही.
“धोनी, रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल हे श्रीमंत आहेत, परंतु त्यांच्या कामगिरीमुळे ते सुपरस्टार आहेत. धोनीने विश्वचषक जिंकला आणि तो खेळातील सर्वोत्तम फिनिशर होता. ती कामगिरी लोक कधीच विसरणार नाहीत. भारतात, १.४ अब्ज क्रिकेटप्रेमी लोक आहेत. तुम्ही लोकांमधून सुद्धा पाच संघ तयार करू शकता जे बहुतांश देशाच्या संघांना पराभूत करू शकतील. भारतात खूप टॅलेंट आहे. पण यामुळेच अनेक युवा खेळाडू दडपणात असतात, मी पाहिलंय इथे प्रत्येकाला धोनी, रोहित शर्मा किंवा विराट कोहली व्हायचे आहे. पण त्यांच्या जागी पोहोचण्यासाठी खूप मोठा प्रवास करावा लागणार आहे. शिवाय तितके यश मिळवल्यावर सुद्धा ते राखून ठेवण्यासाठी फक्त आणि फक्त तुमची कामगिरीच कामी येऊ शकते.”
इथे यशापेक्षा जास्त वेळा तुमचं मन दुःखी होणार आहे. त्यातून वाट काढून जे यशस्वी होतात त्यांच्यासाठी खेळात खूप पैसे आहेत. कदाचित त्यानंतरही काही जण सोशल मीडियावर, जाहिरातींमधून खूप पैसे कमावू शकतात पण जर तुम्ही चांगलं खेळला नाहीत तर तुमचं करिअर उद्ध्वस्त होणार हे निश्चित असतं. असे जस्टीन म्हणाले.