शिवसेना पक्ष फुटल्यापासून दोन्ही गट सातत्याने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. तसेच आम्हीच खरी शिवसेना आहोत, असा दावा करत आहेत. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा ठामपणे सांगितलं की, आमचा पक्ष हीच खरी शिवसेना आहे, कारण आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी चालत आहोत. आम्ही बाळासाहेबांचा विचार सोडलेला नाही. मात्र उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाने बाळासाहेबांच्या विचारांना डावलून औरंगजेबाचे विचार जवळ केले आहेत. बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसचा नेहमी विरोध केला, उद्धव ठाकरे हे त्याच काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. उद्धव ठाकरेंच्या मानेवरचा पट्टा मी उतरवला आहे, याचं श्रेय त्यांनी मला द्यायला हवं, असा टोला लगावला आहे. ते एका मुलाखतीत बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला की, शिवसेना फुटीपासून तुम्ही सातत्याने दावा करत आहात की तुमचा गट हीच खरी शिवसेना आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे तुम्हाला गद्दार आणि स्वतःला खरी शिवसेना म्हणत आहेत. त्यामुळे खरी शिवसेना कोणाची हे येत्या निवडणुकीतून स्पष्ट होईल असं म्हटलं जातं आहे, याबद्दल तुमचं मत काय? यावर एकनाथ शिंदे म्हणाले की, खऱ्या-खोट्या शिवसेनेबद्दल बोलायचं झाल्यास मी एवढंच सांगेन की, आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेत आहोत. आम्ही बाळासाहेबांनी दाखवलेल्या मार्गाने चाललेलो आहोत. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे बाळासाहेबांना ज्या गोष्टी मान्य नव्हत्या, त्याच करत आहेत. उद्धव ठाकरेंना सावरकर नको तर औरंगजेब हवा आहे. त्यांची विचारधारा बदलली आहे. त्यामुळे लोक मतदान करताना या गोष्टीचा नक्कीच विचार करतील, असे मत एकनाथ शिंदे यांनी मांडले आहे.