अन्नधान्याची दरवाढ रोखण्यासाठी व्यापाऱ्यांना आठवड्याचा साठा जाहीर करण्याचे निर्देश दिले गेले आहेत. सर्व प्रकारच्या खाद्यान्नाचे दर नियंत्रणात राहावेत म्हणून केंद्र सरकारकडून लोकसभा निवडणुकीदरम्यान उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, निवडणूक संपताच सर्वच खाद्यान्नाचे भाव कडाडण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा सुरु असून अजून निवडणुकीचे तीन टप्पे शिल्लक आहेत. यंदा कोणतीही लाट नसल्याने विद्यमान सरकारने महागाई वाढू नये म्हणून व्यापाऱ्यांवर धान्य साठ्याची माहिती देण्याचे निर्बंध लादले आहेत. बाजारातही सध्या उन्हाळी सुटीमुळे अनेक जण पर्यटनाला गेलेले आहे. तसेच आंबेही मोठ्या प्रमाणात बाजारात आल्याने ग्राहकांची धान्य बाजारातील गर्दी कमी झालेली आहे. परिणामी, सर्वच धान्यांचे भाव वाढलेल्या स्थितीत स्थिरावलेले आहेत.
ही स्थिरता निवडणुकीचे निकाल लागताच संपेल. निवडणुकीचे निकाल काहीही असोत यंदा उत्पादनच कमी असल्याने डाळी, तांदूळ, साखर, गव्हासह इतरही धान्याचे भाव प्रतिकिलो दोन ते सात रुपयांनी वाढण्याचे संकेत मिळत आहेत. केंद्र सरकारने भाववाढीवर नियंत्रण आणण्यासाठी घेतलेल्या निर्णयामुळेही साठेबाजांनी सावध पवित्र घेतला आहे. साठेबाजी केलेली असली तरी नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी ते घेत आहेत. यात मात्र, कार्पोरेट कंपन्यांचे चांगलेच फावलेले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही कार्पोरेट कंपन्यांनी धान्याची साठवणूक करून ठेवली आहे. सर्वसामान्य व्यापारी मात्र सरकारकडे आठवड्याला साठा देत आहेत. लोकसभा निवडणूक संपताच देशात महागाईचा आगडोंब उसळणार आहे. याबद्दल व्यापाऱ्यांमध्ये जोरात चर्चा सुरू आहे. व्यापारी अतिशय सावधपणे व्यवहार करीत आहेत.
बाजारात सध्या सर्वच धान्यांच्या दरात स्थैर्य आलेले आहे. उन्हाळी सुट्यांमुळे अनेक जण परगावी गेलेले आहेत. सध्यातरी बाजारात ग्राहकांची वर्दळ कमी झालेली आहे. यंदा आंब्याचे दरही कमी असून डाळीची खरेदी कमी झालेली आहे. मात्र, निवडणुकीच्या निकालानंतर सर्वच धान्यांच्या भाववाढीची शक्यता व्यक्त केली जात आहे.