छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात क्रांती चौक परिसरात असलेल्या श्रेयस विद्यालय केंद्रावर मतदारांसाठी सावलीची व्यवस्था करण्यात आली नव्हती. त्यामुळे मतदारांना उन्हामध्ये रांग लावावी लागली. निवडणूक आयोगाच्या वतीने पैसे वाटप करूनही सावलीची व्यवस्था करण्यात आली नव्हती. निवडणूक आयोगाने पाठवलेले पैसे निवडणूक अधिकाऱ्यांनी खाल्ले की कंत्राट घेणाऱ्या कंत्राटदाराने खाल्ले? असा गंभीर प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी उपस्थित केला आहे.
छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे यांच्या विरोधात एमआयएमचे उमेदवार खासदार इम्तियाज जलील आणि महाआघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे अशी लढत होत आहे. दरम्यान क्रांती चौक परिसरामध्ये असलेल्या श्रेयस विद्यालयात मतदान केंद्रावर मतदारांना उन्हामध्ये रांगेत उभे राहावे लागत आहे. वास्तविक निवडणूक आयोगाने सर्व मतदारांसाठी सावलीची व्यवस्था करण्याचे निर्देश दिलेले आहेत. असे असताना देखील येथे सावलीचा टेंट का टाकण्यात आला नाही? असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उपस्थित केला आहे. या संदर्भात लवकरात लवकर योग्य कारवाई करावी, अन्यथा आम्ही मतदान प्रक्रिया बंद पाडू, असा इशारा देखील मनसेने दिला आहे.
निवडणूक आयोगाचा गलथान कशाला म्हणतात, हे या ठिकाणी दिसून येत आहे. निवडणूक आयोगाने पैसे दिल्यानंतर देखील कंत्राटदार येथे सावलीचा टेंट टाकण्यासाठी आलेला नाही. अशा पद्धतीने काम होत असेल तर यांच्यावर कारवाई का करायची नाही? हा सगळ्यात मोठा प्रश्न असल्याचे मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी म्हटले आहे. हा सर्व प्रकार जाणून बुजून केला गेला आहे, असा आरोप देखील मनसेच्या वतीने करण्यात आला आहे.