पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘बाळासाहेबांचे नकली पुत्र’ म्हंटल्याची चर्चा सर्वत्र होत आहे . नरेंद्र मोदींच्या या वक्तव्यावरुन उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे ‘मला नकली म्हणणारे बेअकल’ असं म्हणत ठाकरे यांनी बोचरी टीका केली आहे.
मोदी म्हणाले होते की, ”बायोलॉजिकली तर उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आहेतच. उद्धव ठाकरे आजारी होते तेव्हा मी दररोज त्यांची विचारपूस करायचो. बाळासाहेबांचे पुत्र असल्याने मी त्यांचा सन्मान करणारच. ते माझे शत्रू नाहीत. बाळासाहेबांचे माझ्यावर खूप प्रेम होते. त्यांचे कर्ज मी कधीही विसरणार नाही.” मी बाळासाहेबांचा आदर करतो. उद्धव ठाकरे मला काहीही शिव्या देऊ द्या, पण माझी बाळासाहेबांवर श्रद्धा आहे. त्यामुळे मी त्यांच्याविरोधात काहीही बोलणार नाही. बाळासाहेबांचा आदर आहे म्हणूनच मी शिवसेनेचा मुख्यमंत्री केला. हीच बाळासाहेब ठाकरे यांना माझी श्रद्धांजली होती, असं पंतप्रधान मोदी म्हणाले होते.
काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांना बाळासाहेबांचे बायोलॉजिकली पुत्र म्हणणारे पंतप्रधान मोदी यांनी आता त्यांना नकली संतान का म्हटलं आणि त्यांच्यावर टीका का केली? असा प्रश्न पडत आहे. उद्धव ठाकरे यांनी मोदींचा समाचार घेताना म्हटलंय की, ‘माझ्यावर कितीही टीका करा पण माझ्या आई-वडिलांचा अपमान मी सहन करणार नाही. मला नकली संतान म्हणणारे ते स्वत:च नकली आणि बेअकल आहेत. महाराष्ट्राची जनता त्यांना धडा शिकवणार.’ संजय राऊत यांनी देखील मोदींवर टीका केली. पंतप्रधान मोदी हे औरंगजेबाचे वंशज आहेत, असं ते म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावरुन भाजप आक्रमक झाली आहे.