राज्यात ९ मे ते १५ मे दरम्यान जोरदार पावसाची शक्यता

गेले तीन दिवस तापमानात घट झाली असताना गुरुवार, दि. ९ मे रोजी तापमानात वाढ झाली. त्यामुळे पाऊस पडण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झाले असून आज शुक्रवार, दि. १० मे रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. काही भागात उन्हाचा तडाका इतका आहे कि उन्हामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. तर काही ठिकाणी जोरात पाऊस होऊन पिकांचे नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे.  सोलापुरातही तापमानवाढ झाल्यानंतर त्यात घट झाली. आता पुन्हा तापमानात वाढ झाली असून पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

राज्यात तापमान वाढीमुळे हवेचे जोडक्षेत्र तयार होत आहे. याचा परिणाम मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा विभागात जोरदार पाऊस, तर नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव या जिल्ह्यांतील काही भागांत ९ मे ते १५ मे या काळात पाऊस पडणार आहे.

पावसाची शक्यता असल्याने सोलापुरात दिवसाचे तापमान जास्त असणार आहे. शनिवार, दि. ११ मे वगळता १३ मेपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज आहे. गुरुवार ९ मे रोजी संध्याकाळी जोराचा वारा वाहत होता. त्यामुळे दुचाकीचालकांना वाहन चालवताना अडचणींना सामोरे जावे लागले.   त्यानंतर काही ठिकाणी पावसाचे थेंब पडले.

गुरुवार ९ मे रोजी ४२.२ अंश सेल्सिअस इतके तापमान होते. बुधवारी ४१.१ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली होती. एका दिवसात १.१ अंश सेल्सिअसने तापमानात वाढ झाली. पाऊस आल्यास वातावरणात थोडा गारवा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे  सर्वच जण पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत .