कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभेसाठी चुरशीने मतदान सुरु असतानाच मतदान केंद्रावर एक दुःखद घटना घडली . कोल्हापूर शहरातील उत्तरेश्वर पेठेतील रमाबाई आंबेडकर शाळेत मतदान केंद्रावर वृद्ध मतदाराचा हृदयविवकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेल्या महादेव श्रीपती सुतार (वय 69, रा. उत्तरेश्वर पेठ, कोल्हापूर) यांना मतदार रांगेमध्येच चक्कर आल्याने ते जागेवर कोसळले. यावेळी त्यांना नातेवाईकांसह राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी तातडीने त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार महादेव सुतार मतदानासाठी घरातून बाहेर पडले होते. रमाबाई आंबेडकर शाळेतील केंद्रावर त्यांचे मतदान होते. मतदानासाठी रांगेत उभे असतानाच चक्कर येऊन ते कोसळले. हा प्रकार लक्षात येताच मतदान केंद्रातील राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि नातेवाईकांनी सुतार यांना तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, हृदयविकाराच्या त्यांचे निधन झाले. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.