विधानसभेला २८८ जागांवर उमेदवार उभे करणार : मनोज जरांगेंचं वक्तव्य

  देशात सध्या लोकसभा निवडणुकीचा माहौल आहे. या निवडणुकीवर राज्यात जरांगेंच्या मराठा आरक्षणाचा प्रभाव दिसेल का? याची चर्चा सुरु आहे. यानंतर चार महिन्यांनी राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. पण या निवडणुकीवर मात्र मराठा आरक्षणाचा मोठा प्रभाव असेल असं वक्तव्य स्वतः मनोज जरांगे यांनी केलं आहे.

कारण विधानसभेला आम्ही सर्व २८८ जागांवर उमेदवार उभे करणार आहोत, अशी मोठी घोषणाच मनोज जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे.

मनोज जरांगे यांची प्रकृती सध्या ठीक नसल्यामुळे  त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर इथल्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पण उपचार सुरु असतानाही त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यासाठी त्यांना रुग्णवाहिकेतून छत्रपती संभाजीनगर येथून परभणी लोकसभा मतदारसंघातील शहागड इथल्या गोरी गांधारी मतदान केंद्रावर मतदानासाठी नेण्यात आलं. मतदान केल्यानंतर इथं त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार दिलेले नाहीत. पण आम्ही आता विधानसभेच्या तयारीला लागलो आहोत. विधानसभेला सर्व २८८ जागांवर आम्ही उमेदवार उभे करणार आहोत. यावेळी त्यांनी लोकसभेला आपला कोणालाही पाठिंबा नाही, पण कोणाला मतदान करायचं हे मराठ्यांना बरोबर माहिती आहे, असे यावेळी जरांगे म्हणाले.

आंबेडकर आणि छत्रपतींच्या गादीचा मान राखला गेला पाहिजे असंही यावेळी जरांगे यांनी म्हटलं. दरम्यान, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ. प्रकाश आंबेडकर हे अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. तर राजर्षी शाहू महाराजांचे वंशज शाहू महाराज छत्रपती हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.