कुशिरे येथे दूध उत्पादकांना जातिवंत म्हैशी प्रदान करण्याचा कार्यक्रम संपन्न

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) यांच्या वतीने दुधवाढ कृती कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवला जात आहे. या म्हैस दूध वाढ कृती कार्यक्रमांतर्गत श्री राधाकृष्ण सहकारी दूध संस्था कुशिरे ता.पन्हाळा या संस्थेच्या दूध उत्पादकांनी एच.डी.एफ.सी. बँकेच्या माध्यमातून मुऱ्हा जातीच्या १५ म्हैशी करनाल हरियाणा येथून तर जर्शी जातीच्या १५ गायी बेंगलोर कोलार येथून खरेदी केल्या त्याचे कुशिरे येथे गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते व संचालक मंडळाच्या उपस्थितीमध्ये त्या जनावरांचे दूध संस्थेच्या उत्पादकांना प्रदान करण्यात आले.

यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, शेती पूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्त्वाचा व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गाई,देशी गाई, गावठी दुधाळ गाई आणि दुधाळ म्हशी पाळल्या जातात. प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने तसेच योग्य जातिवंत दुधाळ जनावराची निवड करून व्यापारीदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्चितपणे शाश्वत व्यवसाय असून, यामुळे दुध उत्पादक शेतकऱ्याची आर्थिक प्रगती होण्यास मदत झाली आहे.

पुढे बोलताना श्री डोंगळे म्हणाले की म्हैस दूध वाढ कृती कार्यक्रम गोकुळकडून दूध उत्‍पादक शेतक-यासाठी मोठ्या प्रामाणावर राबवला जात आहे. गोकुळने २० लाख लिटरचे दूध संकलनाचे उद्दिष्टे ठेवले असून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या सहकार्यातून ते शक्य होणार आहे. या कार्यक्रमांतर्गत दूध उत्पादकांनी जातीवंत म्हैशी खरेदी केल्या आहेत. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील दूध उत्पादकांनकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. तसेच संघाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा लाभ घेऊन दूध वाढीसाठी प्रयत्नशील राहावे. असे आवाहन ही चेअरमन अरुण डोंगळे यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले व अमरसिंह पाटील यांनी आपली मनोगत व्यक्त केली. त्याचबरोबर दूध उत्पादक राजाराम कळके यांनी दूध संस्थेला जास्त दूध पुरवठा केल्याबदल व एच.डी.एफ.सी.बँकेचे प्रतिनिधी संतोष नाळे त्यांचा सत्कार मान्यवरांचा हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, अमरसिंह पाटील, सहा.व्यवस्थापक संकलन बी.आर.पाटील, अधिकारी डॉ.कडवेकर, धनंजय यादव, संजय पाटील, प्रकाश माने,डॉ. ईश्वर काटकर, माजी सरपंच विष्णू पाटील, राधाकृष्ण दूध संस्थेचे सुरेश कळके, पांडुरंग पाटील, विष्णू खांडेकर, लक्ष्मण कळके, धनाजी चोपदार,संदीप गुरव, महादेव माने, भिकाजी कांबळे तसेच गावातील ग्रामपंचायत सदस्य, दूध संस्थांचे पदाधिकारी व दूध उत्पादक सभासद उपस्थित होते.