शिरोली पुलाची – शिवसेना शिंदे गटाचे हातकणंगलेचे उमेदवार धैर्यशील माने व कोल्हापूरचे संजय मंडलिक यांच्या विजयासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कंबर कसली असून, आज त्यांनी सायंकाळी सहाच्या दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते माजी आमदार महादेववराव महाडिक यांच्या घरी भेट देऊन जिल्ह्यातील शिवसेनेच्या उमेदवारांसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. तब्बल 2 तास महाडिक यांचे निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या बैठकांचे सत्र चालू असल्याने उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये हा चर्चेचा विषय ठरला.
कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर व हातकणंगले या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील जवळपास सर्व तालुक्यात माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे कार्यकर्त्यांचे जाळे पसरले आहे. याच पार्श्वभूमीवर आज शिरोली येथे माजी आमदार महाडिक यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
यावेळी त्यांचे स्वागत माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी केले. तर खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांनी त्यांचा पुष्पगुच्छ, शाल देऊन महाडिक कुटुंबीयांच्या वतीने सत्कार केला. तर उद्योजक स्वरूप महाडिक यांच्या हस्ते महालक्ष्मीची प्रतिमा भेट देण्यात आली. यावेळी माजी आमदार अमल महाडिक, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष्या शौमिका महाडिक, उद्योजक स्वरूप महाडिक, मंगलताई महाडिक यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य हजर होते .
यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत मंत्री शंभूराज देसाई, माजी मंत्री रामदास भाई कदम, खासदार माने, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी आमदार विजय बापू शिवतारे, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके, शिवाजीराव पाटील, माजी नगरसेवक सत्यजित कदम, राजे अखिलेश सिंह घाटगे यांच्यासह महाडिक गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.