मुंबई: सोन्याचा भाव वाढला मग आमच्या गहू-तांदळाचा भाव का वाढत नाही. शेतीमालाला रास्तभाव हवा. पण प्रत्येक गोष्ट सरकारकडे मागून मिळत नाही.त्यामुळे सरकारकडे मागू नका. कुठलं सरकार आणायचं ते ठरवा,” अशी रोखठोक भूमिका सिनेअभिनेते व नाम फाउंडेशनचे प्रमुख नाना पाटेकर यांनी मांडली.
शेती अर्थ प्रबोधिनीद्वारा आयोजित ११ वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे आयोजन ४ व ५ मे रोजी मोहाडी (ता.दिंडोरी) येथील सह्याद्री फार्म परिसरात युगात्मा शरद जोशी विद्यानगरी येथे करण्यात आले आहे. संमेलनाच्या उद्घाटन सत्रात उद्घाटक म्हणून ते बोलत होते.या वेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष भानू काळे, म. रा. साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य पुष्पराज गावंडे, ज्येष्ठ शेतकरी नेत्या सरोज काशीकर, ज्येष्ठ शेतकरी नेते अॅड.वामनराव चटप, रामचंद्रबापू पाटील, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष व सह्याद्री फार्मचे अध्यक्ष विलास शिंदे, कार्याध्यक्ष गंगाधर मुटे, संयोजक सतीश बोरुळकर आदी मान्यवर उपस्थित होते.