अजित पवार यांच्या ‘त्या’ टीकेला आता अमोल कोल्हे यांचं प्रत्युत्तर

पुणे : सेलिब्रिटी उमेदवार देऊन आम्ही चूक केली, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी – शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली. अजित पवार यांच्या टीकेला आता अमोल कोल्हे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

“अजित पवार यांनी यावेळी अभिनेता गोविंदा, अमिताभ बच्चन, हेमा मालिनी या सेलिब्रिटींची उदाहरणे दिली आणि जेव्हा उमेदवार मिळत नाही तेव्हा सेलिब्रिटी आणला जातो, असं अजित पवार म्हणाले. मात्र, या सेलिब्रिटींमध्ये आणि माझ्यात मोठा फरक आहे. यातील एकाही खासदाराला संसदरत्न मिळालेला नाही. मला तीन वेळेस संसदरत्न मिळालेला आहे. तुमच्या प्रदेशाध्यक्षांपेक्षा माझी संसदीय कामगिरी उजवी आहे”, असं प्रत्युत्तर अमोल कोल्हे यांनी दिलं आहे. त्यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर देण्यासाठी ट्वीटरवरुन एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.अमोल कोल्हे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवार, ४ मार्च रोजी माझ्यावर भाष्य केलं. खरंतर ते मोठे नेते आहेत. त्यामुळे माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीने उत्तर देणे उचित नाही. परंतु त्यांनी माझ्याबाबत वैयक्तिक भाष्य केलं, त्याविषयी उत्तर देणे मला क्रमपाप्त आहे. अजित पवारांनी ज्या सेलिब्रिटी खासदारांची उदाहरणे दिली, त्यातील एकाही खासदाराला संसदरत्न मिळालेला नाही. सेलिब्रिटी उमेदवार देऊन चूक केली किंवा जेव्हा उमेदवार मिळत नाही तेव्हा सेलिब्रिटी आणला जातो, असं अजित पवार म्हणाले होते.