मुख्यमंत्री शिंदे यांचं भाषण सुरू असताना एक मराठा लाख मराठा च्या घोषणा

जुन्नर- पुणे : शिवजयंतीनिमित्त आज राज्यभरात आज उत्साहाचे वातावरण आहे. महाराष्ट्राचं आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज, शिवनेरीवर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनोगत व्यक्त केलं. मात्र त्यांच्या भाषणादरम्यान शिवनेरीवर मराठा आंदोलकांकडून घोषणाबाजी देखील करण्यात आली. मुख्यमंत्री शिंदे यांचं भाषण सुरू असताना मराठा आंदोलकांनी ‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणा दिल्या.

शिवनेरीवरून उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणावर मोठं वक्तव्य केल. ‘मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी उद्या ( मंगळवार, 20 फेब्रुवारी) विशेष अधिवेशन बोलावलं आहे. ओबीस तसेच इतर कोणत्याही समाजघटकाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हे विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे. ‘ उद्याच्या अधिवेशनातून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचं एकनाथ शिंदेंनी जाहीर केलं.