मंत्रालयात सुट्टीच्या दिवशीही 266 अधिकारी कामावर

मुंबई: मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ‘सगेसोयरे’ या अध्यादेशाबाबत हरकतींना मुदतवाढीची मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली होती.पण, ही मागणी फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे आज ( 18 फेब्रुवारी ) मंत्रालयात सुट्टीच्या दिवशीही 266 अधिकारी काम करून याबाबत कार्यवाही करत आहेत.

रविवारचा दिवस असूनही 266 अधिकारी कामावर आहेत. यासंदर्भात सामाजिक न्याय विभागाने जात प्रमाणपत्र व जात प्रमाणपत्र पडताळणी अधिनियम 2000, नियम 2012 यामध्ये दुरुस्तीसाठी 26 जानेवारी 2024 ला अधिसूचना काढली होती. त्यावर सुमारे चार लाख हरकती प्राप्त झाल्या आहेत. या हरकतींचा निपटारा करण्याचे काम कालपासून सुरू करण्यात आले आहे.

यात एकाच व्यक्तीने अनेक हरकती घेतलेले असल्यास ते शोधण्यासाठी हरकती घेतलेल्यांची नावे संपर्क आणि दूरध्वनी क्रमांक संकलित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम लवकरच पूर्ण करून सगेसोयरे अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी मंगळवारी होणाऱ्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याची सर्व तयारी करण्यात आली आहे.