मराठा समाजाच्या कल्याणासाठी घेतलेले महत्त्वाचे निर्णय

मुंबई: राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात असलेल्या मागणीच्या अनुषंगाने इतर समाजाप्रमाणेच मराठा समाजासाठी देखील विविध योजना राबविण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. त्या अनुषगाने गेल्या वर्षभरात राबविण्यात आलेल्या विविध योजनांमुळे मराठा समाजास मोठा दिलासा मिळाला आहे.

या योजनांमध्ये प्रामुख्याने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत वैयक्तिक आणि गट कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत ७४ हजार ८७३ लाभार्थ्यांना ५ हजार ६५९ कोटी बँक कर्ज मंजूर त्यावरील ६०८.१२ कोटी रूपयांचा व्याज परतावा वितरित करण्यात आला आहे. महामंडळाकडून ३५ गट प्रकल्पांना ३.३५ कोटी कर्ज वितरित करण्यात आले आहे. सारथी संस्थेचे पुणे येथील मुख्यालय इमारत आणि ६ विभागीय कार्यालये आणि लातूर व कोल्हापूर येथील उपकेंद्र तसेच ५०० मुले आणि ५०० मुलींच्या वसतिगृहासाठी विनामूल्य जमीन उपलब्ध करून दिली. बांधकामासाठी रु.१ हजार १८८.८२ कोटी रूपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह योजनेंतर्गत ३ लाख ७९ हजार ३७३ विद्यार्थ्यांना १ हजार २९३ कोटी निर्वाह भत्ता वितरित करण्यात आले आहेत. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेंतर्गत १७ लाख ५४ हजार ४९४ विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणासाठी रु.१ हजार २६२ कोटी मंजूर करण्यात आले आहे . छत्रपती राजाराम महाराज सारथी गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी मागील वर्षी ३२ हजार ६३९ विद्यार्थ्यांना रु. ३१ कोटी वितरित करण्यात आले आहेत. तसेच यावर्षी ४४ हजार १०२ विद्यार्थ्यांना रु.४२ कोटी रुपये मंजूर केले आहेत.मराठा समाजाच्या ७५ विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ देण्यासाठी रु.२१ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्यात प्रथमच ह्या योजनाचा लाभ मराठा समाजाच्या विद्यार्थाना मिळणार आहे.मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना समाजकल्याण विभागाच्या स्वाधार योजनेच्या धर्तीवर निर्वाह भत्त्यात भरीव वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . प्रती विद्यार्थी, प्रती वर्ष ६० हजार महानगराच्या ठिकाणी, रु.५१ हजार विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी, रु.४३ हजार जिल्ह्याच्या ठिकाणी आणि रु.३८ हजार तालुक्याच्या ठिकाणी निर्वाह भत्ता विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे वितरीत करण्यात येणार आहे.